*मुंबईचा नऊ गडी राखून मोठा विजय*
*आरसीबीचा लागोपाठ दुसर्या सामन्यात पराभव*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिला प्रीमियर लीगमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग दुसरा सामना जिंकला आहे. स्पर्धेतील चौथ्या सामन्यात मुंबईने आरसीबीचा नऊ गडी राखून पराभव केला. आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव असून स्मृती मंधानाचा संघ आता अडचणीत येऊ शकतो.
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.४ षटकात १५५ धावा केल्या. रिचा घोषने सर्वाधिक २८ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी मुंबईकडून हिली मॅथ्यूजने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईने केवळ १४.२ षटकांत एक गडी गमावून १५९ धावा केल्या आणि सामना जिंकला. हिली मॅथ्यूजनेही शानदार फलंदाजी करत नाबाद ७७ धावा केल्या. त्याचवेळी नॅट शिव्हरने ५५ धावांची नाबाद खेळी केली.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना स्मृती मानधना हिने सोफी डिव्हाईन (१६) सोबत आरसीबीला दमदार सुरुवात करून दिली. दोघांच्या फलंदाजीमुळे आरसीबी काहीतरी मोठे करेल असे वाटत होते, परंतु सायका इशाकने प्रथम डिव्हाईन आणि दोन चेंडू नंतर दिशा कासटला परतवून लावले. पुढच्याच षटकात हेली मॅथ्यूजने मंधाना (२३) आणि हेदर नाइटला सलग दोन चेंडूत बाद करत आरसीबीची धावसंख्या चार बाद ४३ अशी कमी केली. आरसीबीने आठ चेंडूंत चार विकेट गमावल्या. पॉवरप्लेमध्ये त्याने चार गडी बाद ४७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पेरी (१३) ऋचा घोषच्या साथीने धावसंख्या ७१ पर्यंत नेली, परंतु येथे पेरी दुर्दैवाने धावबाद झाली. यानंतर पटियालाच्या कनिका आहुजाने १३ चेंडूत केवळ २२ धावा केल्या नाहीत तर रिचाच्या साथीने धावसंख्या १०५ पर्यंत पोहोचवली. तिला पूजा वस्त्राकरने बाद केले. कनिकाने एक षटकार आणि तीन चौकार लगावले.
आरसीबीच्या सर्व आशा रिचा घोषवर अवलंबून होत्या. तिने एक षटकार आणि तीन चौकारांच्या सहाय्याने २८ धावा केल्या होत्या, परंतु हिली मॅथ्यूजने आक्रमणावर येताच तिला नॅट शिव्हरच्या चेंडूवर झेलबाद केले. १३.३ षटकात ११२ धावांवर सात विकेट पडल्यानंतर आरसीबीचा डाव लवकरच संपणार असल्याचे दिसत होते, परंतु श्रेयंका पाटीलने चार चौकार मारून आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. तिने मेगन शट (२०) सोबत ३४ धावा जोडल्या. १४ चेंडूत २३ धावा करून श्रेयंका बाद झाली.
१५६ धावांचा पाठलाग करताना यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूजच्या जोडीने मुंबईला धडाकेबाज सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. यास्तिका भाटिया २३ धावांवर बाद झाली, पण मॅथ्यूज मैदानावरच राहिली. तिने आपले अर्धशतक २६ चेंडूत पूर्ण केले आणि नॅट शिव्हरसोबत अर्धशतकी भागीदारी करून मुंबईची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. मुंबईने ११ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ११० धावा केल्या होत्या आणि संघाचा विजय निश्चित केला होता. यानंतर शिव्हरनेही २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
हिली मॅथ्यूज आणि नॅट शिव्हर यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत मुंबईला विजय मिळवून दिला. मॅथ्यूजने ३८ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७७ धावा केल्या. त्याचवेळी नॅट शिव्हरने २९ चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. बंगळुरूकडून प्रिती बोसने एकमेव विकेट घेतली.
या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. रेणुका ते मेगन शुट आणि एलिस पेरी सगळ्यांनीच भरपूर धावा दिल्या. मॅथ्यूज आणि शिव्हर या जोडीला आरसीबीच्या गोलंदाजांकडे उत्तर नव्हते. याशिवाय आरसीबीच्या गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी करत अनेक धावा वाया घालवल्या. आगामी काळात पुनरागमन करण्यासाठी आरसीबीला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात बरीच सुधारणा करावी लागणार आहे.
हिली मॅथ्यूजला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तिने गोलंदाजी करताना ३/२८ तर फलंदाजी करताना नाबाद ७७ धावा केल्या होत्या.