गावराठी समन्वय समितीचा पुढाकार
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील कालेली गावातील सुमारे २५ वर्षांपासूनचा होळी उत्सवाचा वाद मिटला. यासाठी गावराठी समन्वय समिती आणि शिमधड्यानी पुढाकार घेत या देवस्थानच्या परब, नाईक, घाडी या मानकऱ्यांचा होळी उत्सवावरुन असलेला वाद सामंजस्याने मिटवला. त्यामुळे आता या गावचा होळी उत्सव पूर्ववत सुरू होणार असल्याने गावातून समाधान व्यक्त होत आहे.कालेली गावातील श्री देव महादेव मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला गावराठी समन्वय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ राऊळ, सचिव भरत गावडे, आंबेगावचे ज्ञानेश्वर परब, नामदेव परब, सांगेलीचे पंढरीनाथ राऊळ, बाळा राऊळ, मोरे गावचे आनंद धुरी, आंबेरीचे मोहन म्हाडगुत, माणगावचे रूपा धुरी, वेर्ले गावचे शिवा राऊळ, गोविंद लिंगवत, कलंबिस्तचे श्री सावंत, चौकुळचे सुभाष गावडे, शिरशिंगे गावचे श्री राऊळ, तसेच आंबेगाव, मोरे, कांदुळी, माणगाव, आंबेरी, वेर्ले, चौकुळ या गावातील देवस्थानचे मानकरी, पांडू परब, आबा परब, मनोहर परब, चंद्रकांत नाईक, अशोक नाईक, राजा नाईक, अण्णा नाईक, कालेलीचे श्रीदेवी माऊली सातेरी महादेव देवस्थानचे मानकरी परब, नाईक, घाडी, सेवेकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी कालेली देवस्थानचे मानकरी परब, नाईक, घाडी यांनी गाव देवस्थान व्यवस्थित चालवण्यासाठी समन्वय समिती व शिमधड्यांच्या उपस्थितीत वाद मिटल्याचे मान्य केले. दरम्यान या देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाचा वादही गावराठी समन्वय समितीच्या पुढाकाराने गेल्या वर्षी मिटवून जत्रोत्सव पूर्ववत सुरू करण्यात आला होता.