कणकवली
कणकवलीतील सर्विस रस्त्यावरून चालत जाणाऱ्या कणकवली बिजलीनगर येथील कीर्ती सावंत यांना कार चालकाने जोरात धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तर कीर्ती सावंत यांच्या सोबत असलेली त्यांची भाची कारची धडक बसून देखील सुदैवाने किरकोळ जखमी झाली. कारच्या धडकेने त्यांची भाची दूरवर फेकली गेली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
हा अपघात कणकवलीत हॉटेल गोकुळधाम समोर रविवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिच्या भाचीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.
अपघातानंतर कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मनोज गुरव, यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात घडल्यानंतर लगेचच राजा पाटकर यांनी एका रीक्षेद्वारे जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर अपघात स्थळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माधव शिरसाट, राजन परब, नितीन म्हापणकर, महेश खोत यांच्यासह नागरिकांनी मोठी गर्दी केली. होती. यावेळी प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार कार एवढ्या वेगात होती की या कारच्या धडकेत मुली जवळपास दहा फूट लांब फेकली गेली. सुदैवाने तिला किरकोळ दुखापत झाली. तर महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ज्या ठिकाणी धडक बसून कीर्ती सावंत या पडल्या त्या ठिकाणी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.