पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीला झाला अपघात.
सावंतवाडी शहरातील हॉटेल पर्ल (मँगो-२/TRC) समोरील सर्कलवर बऱ्याचदा अपघात होता होता वाचतात. रेस्ट हाऊस कडून येणारा रस्ता, तीन मुशीकडून आणि बाजारपेठेतून येणारे असे तीन रस्ते एकत्र येतात, त्यामुळे हा तिठा नेहमीच वर्दळीचा असतो. स्थानिक बऱ्याच वाहनधारकांना गाडीचा इंडिकेटर सुरू करण्याचे गांभीर्य नसते आणि कोण नेमका कुठच्या रस्त्याला वळणार याची समोरच्या वाहन चालकास कल्पना येत नाही. त्यामुळे अनेकदा गाड्यांचे, पदाचार्यांचे रस्ता ओलांडताना छोटेमोठे अपघात होतात.
असाच प्रत्यय आज देखील आला. दुचाकीने जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दुसऱ्या रस्त्याने येणाऱ्या दुचाकीचा अंदाज आला नाही. त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणींच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीची धडक होऊन तरुणी किरकोळ जखमी झाली. हा अपघात पोलीस कर्मचाऱ्यांचा झाल्याने गुन्हा दाखल झाला नाही, परंतु सर्वसामान्य माणसाला मात्र अशा अपघातात देखील पोलीस कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली असती.
हॉटेल पर्ल (TRC) समोरील तिठ्यावर अपघात टाळण्यासाठी मध्यभागी सर्कल करणे आवश्यक आहे. सावंतवाडी नगरपलिकेने सदर ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी सावंतवाडीतील लोकांची मागणी आहे.