कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी 28 फेब्रु. हा दिवस प्रसिद्ध भारतीय भौतिक शास्त्रज्ञ डाॅ. सी. व्ही. रमण यांच्या ‘प्रकाशाचे विकिरण’ या संशोधनाबद्दल राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.
या दिनानिमित्त मुलांनी विज्ञान शिक्षिका विभा वझे, ॠचा काशाळीकर,मिशेल फर्नांडिस, रेश्मा घाडीगावकर, रोहिणी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: बनवलेल्या माॅडेल्स चे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनात सौरमंडळ, व्हॅक्यूम क्लिनर, पाण्याचा कारंजा, वायुशीतक, स्मार्ट सिटी, ज्वालामुखी, रक्त संक्रमण प्रणाली, तरंगणारी पेन्सिल, हायड्रोलिक क्रेन, सारख्या विविध आकर्षक माॅडेल्सच प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. विज्ञान विषयावर प्रश्नमंजुुषाही घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी लोकरे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.कल्पना भंडारी, कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय प्राचार्य श्री.अरुण मर्गज, प्रा.परेश धावडे,श्री. अर्जुन सातोस्कर उपस्थित होते.
विज्ञान दिनानिमित्त भरविण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये शुभेच्छा देत कौतुक करताना ‘शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन आणि मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ याचे उत्तम प्रदर्शन व सादरीकरण या विज्ञान विषयक प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाले. याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा या विज्ञान प्रदर्शनाचा उत्स्फूर्तपणे आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका ऋचा कशाळीकर यांनी केले व आभार सौ. पौर्णिमा ठाकूर यांनी मानले.