कणकवली
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून देवगड व वैभववाडी तालुक्यातील 12 रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 33 कोटी रुपये आपल्या प्रयत्नाने मंजूर झाले, असा दावा सतीश सावंत यांनी नुकताच वर्तमानपत्राद्वारे केला आहे. सदरहू दावा किती फोल आहे हे सुज्ञ जनतेला माहीत आहे. तरीही याबाबत गैरसमज होऊ नये म्हणून भाजपा राज्य परिषद सदस्य महाराष्ट्र सुरेश सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खुलासा केला आहे.
प्रथम प्रश्न पडतो सतीश सावंत हे कोण आहेत? ते आमदार नाही खासदार नाहीत मंत्री सुद्धा नाही. फक्त )संधीसाधू आहेत, असे सिंधुदुर्गातील जनता म्हणते.) मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची मंजुरीची शासनाने पद्धत ठरवली आहे त्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या निधीचे तालुका क्षेत्रफळानुसार वाटप होऊन कितीचा आराखडा बनवायचे हे निश्चित करण्यात येते. व निकषानुसार रस्ते देण्यात येतात व तालुक्याचा आराखडा बनवण्यात येतो. सदर आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविताना त्यावर मतदार संघाचे आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्या सह्या घेण्यात येतात. सतीश सावंत यापैकी कुणीही नाही म्हणून त्याने स्वतःची पाठ थोपटून घेताना सत्य परिस्थितीचे भान राखणे राखले तर बरे होईल.
जी कामे मी मंजूर केली म्हणून सतीश सावंत गाजावाजा करीत आहेत ती कामे 2019 – 2020 मधील बॅच 2 मधील असून जून 2019 मध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली होती. सदर कामांची शिफारस स्थानिक आमदार नितेश राणे यांनी केलेली होती. परंतु मंजुरीनंतर लागलेली विधानसभेची आचारसंहिता, शासनाकडून निधीची कमतरता तसेच कोरोना महामारी चे संकट यामुळे या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. एक वर्ष उलटल्याने निविदा प्रक्रिया नव्याने अंदाजपत्रके बनवून व तांत्रिक मान्यता घेऊन करण्यास शासनाने आता मंजुरी दिली आहे. मंजुरी संपूर्ण महाराष्ट्रातील या योजनेतील कामांसाठी असून फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाही हे सतीश सावंत यांनी लक्षात घ्यावे.
स्वतःच्या स्वार्थासाठी ठेकेदार मित्रांना घेऊन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयांमध्ये सतत फेऱ्या मारणाऱ्या सतीश सावंत यांनी स्वतःच्या प्रयत्नाने कामे मंजूर केल्याचा दावा कशासाठी केला आहे हे समजण्या एवढी जनता दुधखुळी नाही. याबाबत देवगड चे माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांनी वस्त्रहरण केले आहेच. तरी उगाच पोकळ वल्गना करून त्यांनी आपल्या ठेकेदारी वृत्तीचे प्रदर्शन करू नये. मंजूर केलेली एखादी योजना ही आपल्याच प्रयत्नाने असल्याचा सतत प्रचार करणाऱ्या सतीश सावंत यांच्या मताशी त्यांच्या पक्षाचे जिल्ह्यातील दोन आमदार तरी सहमत आहेत का? इतर दोन आमदार काय काम करतात? त्यांच्या ही मतदारसंघातील कामे किंवा योजना या सतीश सावंतांच्या प्रयत्नाने मंजूर होत आहेत का? याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
सतीश सावंत यांनी ठेकेदार मित्रांच्या व स्वतःच्या फायद्यासाठी खोट्या बातम्या पसरवताना आपण कुठे आहोत आणि आपली उंची काय याचे भान ठेवावे. तसेच स्वतः शिफारस करून कामे मंजूर केल्याचे पुरावे सादर करावेत, असे भाजपा राज्य परिषद सदस्य महाराष्ट्र सुरेश सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.