You are currently viewing बालक पालक

बालक पालक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित लिखित*

*बालक पालक*

*दुपारी* मुलींना शाळेतून घरी घेऊन येत असताना त्यांची अखंड चिवचिव चालूच असते, शाळेत काय काय घडलं, शिक्षकांनी कधी छोटसं छान म्हटलेलं असते, तर कधी विनाकारण किंवा सकारण रागावलेलं असते, कधी कोणी चुकीचे वागत असेल तर बाईसाहेबांना पटत नाही म्हणून कुरकुर चालू असते, तर कधी तिसऱ्याच गोष्टीचे टेन्शन आलेले असते…. अशा गप्पांतून मला त्यांच्या शाळेतले वातावरण, मैत्रिणींचे आणि शिक्षकांचे स्वभाव बऱ्यापैकी माहिती झालेल्या असतात. महत्त्वाचं म्हणजे या छोट्याशा वेळेतल्या अमूल्य गप्पांसाठी मी स्वत: त्यांना आणायला जाते कारण हे दिवस पुन्हा सोनं नाणं देऊन सुद्धा परत मिळूच शकत नाहीत. त्यांचे राग, लोभ, प्रेम, माया, द्वेष असे व्यक्तिमत्त्वाचे बारीक-सारीक तपशील समजून घ्यायचे तर प्रत्येकाला खास त्याचा म्हणून वैयक्तिक वेळ आपण दिलाच पाहिजे, तरच तुम्हाला ती व्यक्ती कुठल्या परिस्थितीत कसा विचार करते हे समजते. आपली मुले आहेत म्हणजे सदा सर्वकाळ आपण त्यांच्यावर नियंत्रण नाही ठेवू शकत आणि ठेवूच नये, तशी आवश्यकताच नसते. जेव्हा आई-वडील सगळ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात ठेवू पाहतात तेव्हा मुलांचे एकतर पराकोटीचे परावलंबित्व म्हणजे भावनिक परावलंबित्व तयार होते किंवा ती अधिक हेकेकोर बनलेली दिसतात. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची शक्ती तयार होत नाही किंवा उलट पक्षी फार टोकाचे निर्णय घेतात. तसे हे पालकत्व निभावणे खरेच खूप अवघड आहे पण पर्याय नाही, थोडे त्रयस्थ भूमिकेतून पाहायला शिकलो तर आपण मुलांशी कसे वागतो,ते बरोबर आहे का चूक हे आपले आपल्यालाच कळू शकते. त्यासाठी कुठले सेमिनार अटेंड करायची गरज नाही. मुळात पालकांनीही चांगलाच आदर्श निर्माण करावा लागतो…कारण मुलं तर त्यांचच अनुकरण करतात.

*दोन* मुलांमध्ये तुलना होऊच शकत नाही,कारण प्रत्येक मूल स्वतःची स्वभाव वैशिष्टे घेऊनच जन्माला येते.नंतर कौटुंबिक, सामाजिक वातावरण त्याच्या व्यक्तिमत्वाला उरलेला साधक बाधक आकार देते.सध्याच्या जीवनशैलीत मध्यमवर्गीय पालकांकडे बघितल्यास असे लक्षात येते की ते अतिशय प्रोटेक्टिव्ह झालेले आहेत. एकतर घरात तीन ते चारच माणसे,हम दो हमारे दो, त्यामुळे कुणावर विसंबून रहायची सवयच राहिली नाही. सर्व काही आपल्यालाच करायचे आहे,मुलांचे भविष्य घडवायचे आहे म्हणून प्रत्येक पायरीवर त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून कडक पहारा सुरू असतो. सकाळी शाळेसाठी लौकर उठविणे,बुटाला पॉलिश करून देणे,लेस बांधून देणे,केस नीट करणे,… अर्थात अगदी लहान मुलांचे हे करावेच लागणार पण दुसरी तिसरी पासून ही कामे ते मूल स्वतःचे स्वत: करू शकते की..चुकूदे ना, पण शिकू तर दे. मी तर अशाही आया पाहिल्यात ज्या मुलांची शाळेतली, मैदानातली, बागेतली बारीक सारीक भांडणे सुद्धा सोडवायला जातात. माझ्या मुलाला झोपाळ्यावर बसू दे म्हणून स्वतःच भांडून जागा मिळवतात. कुठले कपडे घालायचे मुलांनी तेही काढून ठेवतात. आता प्रसंगा नुसार मुलांना कपडे कुठले घालायचे हे ठरवू द्यायला काय हरकत आहे? फार तर पर्याय समोर ठेवा. मुले ताटातले सगळे संपवत नाहीत म्हणून प्रत्येक घासन् घास भरवणे हा सुद्धा मुलांना परावलंबी करण्याचाच प्रकार आहे. मुलांचा अभ्यास घेणे हा तर एका स्वतंत्र मोठ्या लेखनाचा विषय आहे. एवढे सगळे नियंत्रणात ठेवून जर एखाद्या वेळी गरज पडली म्हणून काही वाणसामान आणायला सांगितलं तर जवळच्या दुकानात जाऊन ते बरोबर आणता येईल का मुलांना? मग, मुर्खा तुला एवढे सुद्धा कळत नाही.. असे म्हणून मुक्ताफळे उधळण्यात आपलाच मूर्खपणा दिसून येईल.

*उलट पक्षी* ज्या आई-वडिलांना एवढे सगळे करायला, मुलांच्या मागे मागे धावपळ करायला वेळच नसतो त्यांची मुले लवकर स्वावलंबी झालेली दिसून येतात. एक उदाहरणच देते ना तुम्हाला. आमच्या कॉलनीच्याच रस्त्यावर एक छोटे खाणी सायकलचे दुकान आहे. दुकान म्हणजे शेडनेट लावून तयार केलेली एक छोटशी आडोशाची जागा.तर तिथं एक मुलगा साधारण आठवी नववीत असेल सायकल दुरुस्तीची सगळी कामे करतो. त्याच्याशी बोलताना लक्षात आले की तो शाळेतही नियमितपणे जातो. घरी आई आणि तो मुलगा दोघेच जण असतात. अगदी जुन्या सायकली विकणे खरेदी करणे इतपत सगळे व्यवहार तो स्वतःच्या अक्कल हुशारीने करतो. दिवाळी जवळ आली की एका हातगाड्यावर रांगोळीचे रंग, पणत्या, डेकोरेशनचे सामान वगैरे घेऊन ते विकतो. संक्रांतीच्या दिवसात मस्तपैकी रंगबिरंगी पतंग, मांजा यांची विक्री करतो. रंगपंचमीला निरनिराळे रंग, पिचकारी असे सामान विकून व्यवस्थित पैसे कमवतो. म्हणजे तो आम्हाला इतका हरहुन्नरी वाटतो की आम्ही विचार करत असतो आता तो पुढल्या सणाला कशाची बरं विक्री करेल? ते पाहायला पण आम्हाला आवडतं आणि त्याच्या दुकानात खरेदीही होऊन जाते. बोलणंही त्याचं ईतकं साधं पण चतुर आहे की जवळपासच्या सगळ्या दुकानदारांशी त्याची छान गट्टी जमलेली असते. तर सांगायचा मुद्दा हा की हे सगळे त्याला कोणी शिकवलं असेल? शाळेचा तर प्रश्नच नाही. हो परिस्थितीनं नक्कीच शिकवले हे मान्य पण त्यामुळे उद्या पुढे जाऊन तो एकटा जरी पडला या जगात तर उपाशी राहणार नाही हे पक्के आहे. आता त्याच्याच वयाची आपल्या घरातली मुले बघा. किती फरक आहे? याचे उत्तर प्रत्येकालाच माहीत आहे. तुलना कुठल्याच गोष्टीची करायची नाही आपण; पण आत्मविश्वास निर्माण करणे शेवटी पालकांच्या हातात आहे. चुकू देत मुले, चुकत चुकत एक दिवस शिकतीलच ना? आपले जर खरे प्रेम असेल मुलांवर तर आपल्या शिवाय त्यांना राहायला आले पाहिजे इतके त्यांना आत्मनिर्भर करणे आवश्यक आहे. विपर्यास नको पण निदान घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत असलेले त्यांचे परावलंबित्व हे आपल्या अति प्रेमाचे फळ आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्या गैरहजेरीत समजा भूक लागली तर फक्त मॅगी करून न खाता एखाद्या वेळी डाळ भाताचा कुकर सुद्धा लावता येणे, तव्यावर साधे थालीपीठ लावता येणे, दूध तापवणे, अंड्याचे ऑम्लेट करणे, वेळेत शाळेत जायची सवय, शाळेतून घरी आल्यावर
आपले कपडे,मोजे, बूट,दफ्तर जाग्यावर ठेवणे,डबा काढून घासायला देणे,रोज अभ्यास पूर्ण करणे…या आणि अशा कितीतरी बारीक सारीक गोष्टींत आपण त्यांना स्वावलंबी बनवू शकतो. त्यांची सेवा करण्याची काहीच गरज नाही,ज्याने त्यांचेच नुकसान होईल. कधी आपणही आजारी पडू शकतो अशावेळी निदान कपभर चहा तरी करून देता यावा मुलांना.

पतंगाच्या दोराला ढील दिली की तो उंच उंच जाऊन आकाशात विहरतो पण दोर आपल्याच हातात असतो. तसंच गरज पडल्यास तोच दोर गुंडाळून परत पतंग खाली घेता येतोच. मुलांचही तसंच आहे, त्यांच्या कल्पनेच्या भरारीला वास्तवाच्या दोरानं बांधून उंच उडू देणं आणि दोराचं दुसरं टोक आपल्या हातात ठेवणं ही कला आहे.
त्याचबरोबर आपण मुलांचे पालक आहोत, मालक नाही हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं.

अंजली दीक्षित
औरंगाबाद
९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा