You are currently viewing मराठी भाषेचा उदय

मराठी भाषेचा उदय

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*

*मराठी भाषेचा उदय*

माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद, मला नित्य मोहवीत

या कवी विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ओळी आहेत. कवी विनायक कुलकर्णी यांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे खरे तर आज, मराठीची गोडी कुठेतरी हरवली आहे असे वाटते. साडे तीन शक्तीपीठ, बारा ज्योतिर्लिंग, आठ अष्टविनायक, अकरा हनुमान आणि जगातील सात आश्चर्यांपैकी चार आश्चर्य महाराष्ट्रात तसेच मराठा कालखंडातील बारा मावळ प्रांत या महाराष्ट्र राज्यात एकवटलेले असून आपला महाराष्ट्र चारही बाजूने सह्याद्रीने एकवटलेला आहे. आणि त्याच सह्याद्रीच्या भूगर्भात मराठी भाषेचा जन्म झाला. होय. सातवाहन कालखंडात मराठीतला “गाथासप्तशती” हा पहिला ग्रंथ लिहिला गेला. आणि मग पुढे मराठी भाषा यादवांनी समृद्ध केली. त्याही पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेतून मराठी भाषा ही वृद्धिंगत केली. याच मराठी भाषेला साडे तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे हे आपल्याला माहिती आहे तरी आजपावेतो मराठी भाषेची दिशा बदलत चालली आहे, आणि दशा निर्माण होताना दिसत आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून खूप दिवसांपासून झटापट सुरू आहे. पण मुळात मराठी भाषेचा दर्जा खालवला जात आहे तर भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मराठी भाषेचा अभिमान किती उंचावणार आहे हे पाहण्यास बड्या उत्सुकतेचे ठरेल.


कोण कुठले ते इंग्रज इंग्लंड मधून महाराष्ट्रात आले, आपले वर्चस्व प्रस्थापित केले, आणि तब्बल साडे तीनशे वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांनी त्यांची भाषा आपल्याला, आपल्या मराठी धर्मियांना देऊ केली आणि आपणही ती त्यांची इंग्रजी भाषा हसत हसत हस्तगत केली. अरे, पण आपण मराठी भाषा टिकवण्यासाठी स्वतःहुन किती प्रयत्न केले. केवळ मराठी राजभाषा दिन आहे म्हणून मराठी मराठी करतो, मराठी भाषेचा उदो उदो करतो, सोशल मीडियावर स्टेटस ठेवतो, फोटो ठेवतो, चार भाषणे देतो आणि झाला मग आपला मराठी राजभाषा दिन साजरा. हो ना! बाकी वर्षभर मराठी भाषेचा एक अंकुश समाजात वावरताना दिसत नाही. जिथे तिथे इंग्रजी भाषेचा उदो उदो होताना दिसतो. का? तर म्हणे आपल्या मराठी भाषेला स्टँडर्ड नाही. त्या इंग्रजी, हिंदी, पंजाबी लोकांसमोर मराठीतून बोलण्यास लाज वाटते. आपण मराठी भाषेत, आपल्या मातृभाषेत फार पूर्वीपासून पारंगत असून कोणी हिंदी, इंग्रजी बोलताना आढळले की आपण ही त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो किंवा बहुधा त्यांच्याच भाषेत बोलत असतो. याउलट कधी असे ही होते दोन मराठी व्यक्ती भेटल्यानंतर एकमेकांना न ओळखताच हिंदी भाषेचा गाडा पुढे ढकलतो. हीच ती वास्तविकता आहे आपल्या दुर्गम समाजातील.

जे का रंजले वा गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा

संत तुकारामांनी लिहिलेल्या या ओळी, अभंग, बहिणाबाईंच्या ओव्या, संत ज्ञानेश्वर यांचे अभंग, संत एकनाथ यांचे भारुड हे काळाच्या पडद्याआड जात चालले आहे. कारण मराठी वाचन, विचारसरणी कमी पडत चालली आहे आपली. ज्याची जागा आता इंग्रजी आणि हिंदी ने घेतली आहे. रॅप करणारा हनी सिंग, बादशाह, मुलांच्या लक्षात आहे पण मंडलेच्या तुरुंगातून समुद्र मार्गी परतताना

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला

म्हटलेले स्वातंत्र्यवीर सावरकर नाही आठवत कोणाला. पुण्याच्या येरवडा तुरुंगात राहून “गीतारहस्य” ग्रंथ लिहिणारे युगपुरूष लोकमान्य टिळक नाही आठवत कोणाला, तसेच जालियनवाला बाग हत्याकांड मांडणारे

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता अजुनी शब्दांचे

कविवर्य कुसुमाग्रज नाही आठवत कोणाला. हीच मोठी गंभीर बाब आहे आपल्या मराठी माणसांची. आपण ही मराठी धर्म पाळत नाही, भाषा जपत नाही शिवाय आपल्या मुलांनाही शिकवत नाही. मग कसे होणार आपल्या मराठी भाषेचे जतन? आणि मग

आमच्या मनामनात दंगते मराठी
आमच्या रगारगात रंगते मराठी
आमच्या उराउरात स्पंदते मराठी
आमच्या नसानसात नाचते मराठी

हे तरी कोणत्या तोंडाने म्हणणार? आणि मोठ्या अभिमानाने गर्व बाळगणार मी मराठी असल्याचा? फक्तं लोकांना तुम्ही महाराष्ट्रात राहतात तर मराठी बोलता यायलाच हवे, अशा पद्धतीने दटावून किंवा सांगून, बळजबरी करून चालणार नाही तर त्यावर ठोस पावले उचलावी लागतील. आपणच बेजबाबदारपणे वागतो आणि मग इतर मराठी लोकांना दोष देत फिरतो. आज मोठ्या लोकांना, बिजनेसमन लोकांना, एखाद्या परदेशातील व्यक्तीपुढे इंग्रजी बोलायला भारी आवडते, मोठा अभिमान वाटतो. आजकालच्या लहान मुलांना ही आपल्याला इंग्रजी बोलायला यायला लागले की आभाळाहून मोठं झाल्यासारखं वाटतं. बरं ते सोडाच आपल्या मुलांना इंग्रजी बोलता यायला हवं म्हणून पालक खास इंग्लिश स्पीकींग कोर्स करायला सांगतात. अमाप पैसा ओततात. पण मराठी पुढे जराही टिकाव लागू शकत नाही यांचा. मुलाला चांगली नोकरी मिळावी, चांगले शिक्षण मिळावे या करता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांचे प्रवेश घेतात. अरे, पण या सगळ्यात तुम्ही, आपण सगळेच लोक आपल्या मूळ मराठी मातृभाषेलाच विसरत चाललो आहोत त्याचं काय? ते कोण बघणार?
दुसरी गोष्ट ही मुले शिकून पुढे जाणार, उत्तम मार्कांनी पास होणार, कॉलेजला जाणार पण तिथेही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणार. शिक्षण संपल्यावर बाहेर नोकरीसाठी अर्ज करणार. तिथेही नोकरीला भरती होण्यासाठी तेथील कंपनीचे मॅनेजर, एचआर आधी त्या संबंधित मुलाला इंग्रजी किती चांगल्या प्रकारे जमतं, इंग्रजीत किती योग्यतेने बोलतो ते बघणार, त्यावर त्याची परीक्षा घेणार, इंग्रजी मधूनच त्याची मुलाखत घेणार आणि मग त्यास कंपनीत भरती करणार. त्यातल्या त्यात एखादा मुलगा मराठी माध्यमातून आला असला की केवळ त्याला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून भरती होण्यापासून रोखणार. त्याला बाहेर फेकणार. पण त्याकडे कला किती प्रकारच्या आहे. त्या नोकरीसाठी आवश्यक असणारे ज्ञान, कौशल्य किती अंगभूत आहे हे महत्त्वाचे नाही त्यांच्यासाठी. परंतु, याउलट फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या मुलाला त्या नोकरीविषयक ज्ञान नसेल, कौशल्य नसेल तर त्याला शिकावू म्हणून घेतील परंतु त्याचीच निवड करतील. तर ही आहे आपल्या समाजातील मराठीची अवस्था व मानसिकता. या अशा कला, शिक्षण, रोजगार यांच्या बाबतीत मराठीच्या ऐवजी इंग्रजीचे प्रस्थ अधिक वाढत चालले आहे. मग हे असे असेल तर का कोण मराठी माध्यमांचे शिक्षण घेऊन स्वतःवर उपासमारीची वेळ येऊ देईल? बाहेर इंग्रजीचे प्रस्थ मोठे आहे म्हणून, आज मराठी माध्यमाची शाळा बंद पडत चालल्या आहेत. विद्यार्थी, पालक बहुसंख्येने मराठी माध्यमांच्या शाळांकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. हे कुठेतरी थांबल पाहिजे.


मागे प्रत्येक शाळा, कॉलेज आणि प्रत्येक इयत्तेत यास्तव पदवी, पदव्युत्तर पदवी या ठिकाणी सुद्धा मराठी भाषेचा विषय सक्तीचा करण्याची मोहीम आखण्याचे काम सुरू होते. तसे झाले ही आज प्रत्येक इयत्तेत, प्रत्येक शाळेत, प्रत्येक कॉलेज मध्ये मराठी विषय सक्तीचा केला देखील आहे. परंतु, एवढ्याने होईल काय? नाही. केवळ शाळा कॉलेजमध्ये मराठी विषय सक्तीचा करून काही होणार नाही, तर मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. मराठी माध्यमात सर्व प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यायला हवेत. शिक्षण संस्था, विद्यापीठ जर बी.कॉम, बी.ए., एम.कॉम, या अभ्यासक्रमाला मराठी माध्यम खुले करून देऊ शकत आहेत तर मेडिकल, लॉ, एम.बी.ए, एम.एस्सी, यांसारख्या व इतर सर्वच अभ्यासक्रमाना का नाही मराठी माध्यम उपलब्ध करून देऊ शकत? वास्तविक पाहता यातील काही अभ्यासक्रम हिंदी माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत पण मराठी माध्यमांमध्ये नाही. शिवाय जर मराठी विषय घेऊन त्यात तुम्ही पी. एच.डी किंवा एम.डी करण्यासाठी पर्याय खुले करून देत आहात. तर मग या मुलांना त्या शिक्षणावर आधारित रोजगार का उपलब्ध करून देऊ शकत नाही? मराठी विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन जर एखाद्या महाविद्यालयात शिक्षक म्हणून रुजू व्हायचे असेल तर पुन्हा त्यासाठी डी.एड, बी.एड, किंवा नेट सेट प्रवेश परीक्षा देऊन पास होण्याची सक्ती का केली जाते? मग त्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन फायदा काय? आणि त्या परीक्षांची प्रवेश फी ही थोडी नाही. शिवाय अभ्यासक्रम ही सोपा नाही. त्यात प्रतिस्पर्धी ही बरेच असतात. तो अभ्यास करूनही जर ती परीक्षा उत्तीर्ण झाली नाही तर त्या विद्यार्थ्याला जो पर्यंत ती परीक्षा उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षक होण्यापासून वंचित राहावे लागणार. आणि तो पर्यंत जर त्या विद्यार्थ्याचे वय निघून गेले तर उपासमारीत जगायचं का? म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांच्या नशिबी आर्ध आयुष्य संघर्षच पुजलेला आहे का? थोडी फार तसदी शैक्षणिक संस्थांनी सुद्धा घ्यावी आमच्या डोक्यावरचा भार हलका करावा. इथे या प्रश्नांचे उत्तरे शोधण्याचे वांदे आहेत. आणि हे बाकी लोक महाराष्ट्रात राहणाऱ्यांना निव्वळ बोलण्यासाठी मराठी सक्तीची करताहेत. इतर राज्यात जाऊन बघा तिथे त्यांच्याच भाषेला सर्व क्षेत्रात प्राधान्य दिले जाते. आपल्यासारखे नाही तिथे. स्वतःची भाषा सोडून इतरांच्या भाषेवर प्रभुत्व मिळवत बसायचं. म्हणजे ते असं झालं आपल ते फाटकं दुसऱ्याचं ते लोभस.
मुळात मी म्हणतो, विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात शिकावं की इंग्रजी माध्यमात शिकावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही फक्तं सर्व अभ्यासक्रमात मराठी माध्यम उपलब्ध करून द्यायचे काम करा. शिवाय बाहेरील खाजगी कंपण्यातही मुलाखत मराठीतून देण्याचा एक पर्याय उपलब्ध करून द्यावा. म्हणजे मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून ज्याला जे सोयीस्कर वाटेल तो त्या माध्यमातून मुलाखत देऊ शकेल. पण निव्वळ इंग्रजी बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याचे भवितव्य धोक्यात घालण्याची चूक करू नका. शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याचा आयुष्याचा प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. अहो, आत्महत्या करताहेत हो विद्यार्थी नोकरी मिळत नसल्याकारणाने. घरात आईवडील उभे करत नाही, आणि बाहेर समाजातील लोक टोमणे मारून हिणवत असतात. लग्नाला मुलगी मिळेनाशी झाली आहे मुलांना. निदान मुलांच्या आयुष्याचा, भवितव्याचा आणि आपल्या माय मराठी भाषेचा विचार करून तरी एक पाऊल उचला. समस्त विद्यार्थी वर्गाच्या वतीने एकच सांगू इच्छितो,”प्रमाणित भाषेचा दर्जा टिकवायचा असेल आणि मुलांचे भवितव्य चांगले घडावे वाटत असेल तर, सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम हा मराठी माध्यमातून खुला करावा, बाहेर कंपन्यांमध्ये चालत असलेल्या मुलाखतींना ही मराठी माध्यम खुले करावे, व त्याच मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती करावी, तसेच शिक्षण प्रसार माध्यमे आता मराठीतून उपलब्ध करून देण्याची तसदी घेण्यात यावी”. बघा, एवढे केले की नक्की आपला मराठी बाणा आणि काना जगात वर्चस्व गाजवल्याशिवाय राहणार नाही. मराठी भाषेचा दर्जा उंचावेल, मराठी भाषा ही जागतिक पातळीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल, या राज्यात जन्माला आलेला प्रत्येक विद्यार्थी अभिमानाने मराठी शिक्षण घेऊन बाहेर पडेल, पुन्हा मराठी पुस्तके, साहित्य वाचण्यास अधिकचा जोर वाढीस लागेल, पुढे येणारा प्रत्येक विद्यार्थी मराठी शाळेकडे एकदा तरी वळून बघेल, बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा एकदा नव्याने उघडतील, आणि मराठी भाषेचा वारसा पिढ्यानपिढ्या नवीन कलाविष्कार घडवेल यात तीळ मात्र ही शंका नाही. जिथे जिथे तुम्ही कान लावाल तिथे तिथे मराठीचा उद्घोष ऐकू येईल आणि एकच नाद झळकू लागेल,

|| जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ||

लेखक : नयन धारणकर, नाशिक
8275838083

प्रतिक्रिया व्यक्त करा