You are currently viewing मराठी गीत संगीत, समुहनृत्यांचा सुरेल कलाविष्कार लतांजली

मराठी गीत संगीत, समुहनृत्यांचा सुरेल कलाविष्कार लतांजली

इचलकरंजी

ओम नमोजी आद्या, दाता तू गणपती या गणेश वंदनेपासून सुरु झालेला आणि अखेरच्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा, शतकाच्या यज्ञातून व जयदेव जयदेव जय शिवराया या गीत त्रयीपर्यंत उंचीवर पोहोचलेला ‘लतांजली’ हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा असाच झाला. मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद या कार्यक्रमाने मिळवली. नृत्यकलाकारांनी सादर केलेली तालबद्ध, वेधक समुहनृत्ये त्याचबरोबर सर्वच गायक कलाकार आणि वादक कलाकारांनी सादर केलेली श्रवणीय गीते तसेच माहितीपूर्ण व प्रभावी निवेदन यामुळे एकूणच कार्यक्रम बहारदार ठरला.

येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल आणि नाट्यपरिषद इचलकरंजी शाखा यांच्यावतीने हा कार्यक्रम मराठी दिन महोत्सवात तिसऱ्या दिवशी संपन्न झाला. येथील महानगरपालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख आणि शल्य विशारद डॉक्टर गोविंद ढवळे यांच्या हस्ते नटराज व कुसुमाग्रज प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सौ. हेमल सुलतानपुरे, अमोल शहा, राजन मुठाणे, प्रा. प्रशांत कांबळे, सायली होगाडे, चित्कला कुलकर्णी, महेश हिरेमठ, अतुल शहा, सुमन सुलतानपुरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी देशमुख आणि ढवळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले.

कार्यक्रमात भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सांगितीक प्रवासातील, विविध शैलीमधील निवडक गीते सादर करण्यात आली. ऐरणीच्या देवा तुला, चांद केवड्याची रात, आनंदी आनंद गडे, जयोस्तुते, राजसा जवळी जरा बसा, विठाई किठाई, लटपट लटपट, इत्यादी गीतांवर आकर्षक आणि मनोहारी समूह नृत्याविष्कार सादर करण्यात आले. गीतानुरूप वेशभूषा, मुद्राभिनय आणि आकर्षक संरचना यामुळे सर्व नृत्यांनी रसिकांची दाद मिळवली. नृत्य दिग्दर्शन सौ. सायली होगाडे यांनी केले होते. लता मंगेशकर यांच्या जीवनातील विविध घटना आणि प्रसंगांमधून त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारे निवेदन सौ. चित्कला कुलकर्णी व प्रा. समीर गोवंडे यांनी केले. अंतरंग, कोल्हापूर या संस्थेच्या सर्वच गायक आणि वादक कलाकरांनी कार्यक्रमातील गाणी अतिशय उत्तमरीत्या सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी घनश्याम सुंदरा, मेंदीच्या पानावर, धुंद मधुमती, माझ्या शेतात सोनंच पिकतय, चिंब पावसानं रान, वेडात मराठे, मी डोलकरं, संधिकाली या अशा, मी रात टाकली, असा बेभान हा वारा इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची गाणी सादर करण्यात आली.

कार्यक्रमातील समुहनृत्यांमध्ये मीनल लांबा, निकिता रुगे, मयुरी दंडगे, श्वेता कुलकर्णी, हर्षदा जोशी, संजीवनी शिंदे, सोनाली होगाडे, ऐश्वर्या खोत, काजल डीगे, पूजा बसूदे, साक्षी शहा, निशा ढाले, सिद्धी भस्मे, साक्षी बारवाडे, स्नेहा वर्मा, मंजिरी बडवे, स्वराली जामदार, गार्गी नरदे, तनिष्का सुतार, आराध्या शिंदे, रिद्धी चौगुले, जिगीषा बंब, पल्लवी खैरनार, आर्या चांदेकर, दिपाली सपाटे, गीतांजली बडवे, पुनम मट्टीकली, नेत्राली जोशी व आशा मनोळे यांनी सहभाग घेतला. यावेळी झालेल्या सादरीकरण कार्यक्रमात संगीता गजरे, राजेश्वरी सवदी, विभा भागवत, श्रेया व आर्या सवदी, स्नेहल कुलकर्णी, प्रतीक साठे, सचिन चौधरी, विद्याधर जेरे, सचिन सौदी, आदित्य जेरे, वेदराज चौधरी, कृष्णा मट्टीकली व श्रीश सौदी यांनी सहभाग घेतला.

गायक या नात्याने महेश हिरेमठ, शुभांगी जोशी, शितल पोतदार व रसिका झावरे यांनी जबाबदारी पार पाडली. तर सुनील गुरव, भूषण साटम, राजू आवटी, सचिन देसाई व महेश कदम यांनी उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमातील वेशभूषा व रंगभूषा सायली होगाडे, ज्योती सांगले, सुनंदा डांगरे व सुनीता वर्मा यांनी केली होती. रंगमंच व्यवस्था संतोष आबाळे व सचिन चौधरी यांनी पाहिली तर उत्कृष्ट अशी ध्वनी व्यवस्था प्रवीण व प्रशांत होगाडे यांची होती. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह भरून मोठ्या संख्येने इचलकरंजी व परिसरातील रसिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा