सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या सहाव्या शिवजागराला उस्फूर्त प्रतिसाद…
सावंतवाडी
शिवाजी महाराजांच्या काळात सुध्दा इमानदारांसोबत लबाड होते, फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले, परंतू अशा लोकांना सोबत घेवून त्यांनी स्वातंत्र्य निर्माण केले, हे महाराजांचे मोठेपण म्हणावे लागेल. छत्रपती संयमी आणि हुशार असल्यामुळेच स्वराज्य निर्माण होवू शकले. त्यावेळी वतनापेक्षा इमानदारीला महत्व होते, असे मत शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेट्ये यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान आत्ता सारख्या नोटीसा पाठविणे, चौकश्या लावणे, हे सर्व प्रकार त्यावेळी सुध्दा होते. मात्र महाराजांना मानणारे त्यांचे मावळे फुटले नाहीत. त्यांनी आपल्याला काय मिळेल यापेक्षा स्वामी निष्ठा महत्वाची मानली. त्याचाच परिपाक म्हणून त्यांच्या सोबत राहीलेले मावळे इतिहास रचू शकले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या शिवजागराच्या निमित्ताने येथिल राजवाड्यात ते बोलत होते.
यावेळी श्रीमंतराजे खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखम सावंत-भोसले, भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, डॉ. प्रवीण ठाकरे, डॉ. उदय नाईक, ॲड. शामराव सावंत, इतिहासतज्ज्ञ डॉ. जी.ए. बुवा, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक वाय. पी. नाईक, डॉ. विशाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर यावेळी माजी सैनिक धोंडी पास्ते, रामचंद्र सावंत, विनायक बागायतकर, कराटे प्रशिक्षक वसंत जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ या विषयावर पुष्प गुंफतांना इतिहासकार शिवरत्न शेटे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे अतुलनीय शौर्य, विलक्षण बुद्धीचातुर्य, अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि गनिमी कावा या साऱ्यांची जगाला प्रचिती देणारे युद्ध म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम होय. अफाट फौजेनिशी आलेल्या अफजलखानाला मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याने प्रतापगडावरच संपविले. यामागे छत्रपती शिवरायांची अलौकिक बौद्धिक क्षमता तर होतीच शिवाय त्यांच्याजवळ असलेले त्यांचे विशेष वकील पंतोजी गोपीनाथ बोकील यांची प्रसंगावधान कूटनीती आणि गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची मुत्सद्येगिरी देखील महत्वपूर्ण व निर्णायक ठरली. १० नोव्हेंबर १६५९ रोजी दुपारी दीड वाजता छत्रपती शिवराय व अफजल खान यांची झालेली भेट आणि त्यानंतर अफजलखानाने गमावलेला प्राण ही घटना म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती. मराठ्यांना त्यांच्या पराक्रमाची जाणीव या घटनेमुळे तर झालीच, परंतु छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाथा अफगाणिस्तान, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, इंग्लंड अशा अनेक देशांपर्यंत पोहोचली. म्हणूनच प्रतापगडाचा रणसंग्राम केवळ अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे एवढीच मर्यादित ही घटना नाही, तर जगातील सर्वोत्तम युद्धांपैकी एक आहे, असे इतिहासकार सेतू माधव पगडी लिहितात, असेही भाष्य शिवरत्न शेटे यांनी केले.
आपल्या व्याख्यानातून शिवरत्न शेटे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या अंगी असलेल्या मातृत्व, दातृत्व, नेतृत्व, धैर्य व प्रसंगावधान अशा गुणांचा परिचय करून दिला. महाराजांच्या अंगी असलेल्या मानसशास्त्रीय कौशल्यांचा परिचय सुद्धा आपल्या व्याख्यानातून श्री. शेटे यांनी करून दिला.
आपल्याला अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते, असे सांगण्यात येते. मात्र हे अत्यंत चुकीचे असून शिवरायांचा आरमार प्रमुख दौलत खान होता. महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांची सुटका करण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत करणारा मदारी मेहतर, शिवरायांचे वकील काझी हैदर व शिवरायांचे चित्र रेखाटणारा थोर चित्रकार मीर मोहम्मद हे सर्वच मुस्लिम समाजाचे होते. मात्र स्वराज्यासाठी ते छत्रपती शिवरायांबरोबर ‘मराठे मावळे’ म्हणून लढले. म्हणून आपण छत्रपती शिवरायांची सर्वधर्म समभाव वृत्ती व छत्रपती शिवरायांचा दूरदृष्टीकोन समजून घेतला पाहिजे आणि इतिहासाचे विकृतीकरण थांबवले पाहिजे, असे आवाहन आपल्या व्याख्यानातून शिवरत्न शेटे यांनी केले.
छत्रपती शिवरायांनी आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात जीवाला जीव देणारे सवंगडी, मित्र व मावळे तयार केले. म्हणूनच ‘स्वराज्य’ उभे राहू शकले. स्वतः च्या मुलाचे लग्न बाजूला करून कोंढाणा घेण्यासाठी जीवाचे बलिदान देणारे तानाजी मालुसरे, सिद्धी जोहरशी प्राणपणाने लढणारे शिवा काशीद, फक्त ३०० मावळ्यांना घेऊन घोडखिंड लढणारे बाजीप्रभू देशपांडे, तसेच महाराजांसाठी स्वतःचे प्राण सदैव वेचण्यासाठी तयार असलेले जिवाजी महाले, हिरोजी इंदुलकर, येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद असे कितीतरी निष्ठावान मावळे महाराजांनी तयार केले म्हणूनच छत्रपती शिवराय हे केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात शेकडो गड किल्ले जिंकून स्वराज्य उभे करू शकले. मात्र अलीकडे स्वार्थासाठी निष्ठा विसरून गेलेले राज्यकर्ते निर्माण झाले आणि म्हणूनच स्वराज्याचे सुराज्य होऊ शकले नाही, अशीही खंत शेटे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल गव्हाणकर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका सीमा पंडित, आभार अँड्र्यू फर्नांडिस यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधुमित्र सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.