You are currently viewing महाराष्ट्राच्या मातीत रुजली माय मराठी

महाराष्ट्राच्या मातीत रुजली माय मराठी

संपादकीय…..

🚩🚩 *महाराष्ट्राच्या मातीत रुजली माय मराठी* 🚩🚩

*माझ्या मराठी मातीचा*
*लावा ललाटास टिळा*
*हिच्या संगाने जागल्या*
*दऱ्या खोऱ्यातील शिळा*

असे ज्या मराठी भाषेचे वर्णन कवी कुसुमाग्रजांनी केलंय त्या मराठी भाषेचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्रीयनांच्या अंगात असला तरंच मराठी भाषा खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस पाहिलं…आणि मराठी भाषा अटकेपार झेंडा रोविल….🚩
आज *मराठी राजभाषा दिवस* म्हणजेच *कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस*
सर्वमान्य आद्यकवी मुकुंदराज आणि ज्ञानेश्वरांनी मराठीची वैशिष्ठ्ये तिच्या सामर्थ्यांसह मांडली आहेत. शके १११० मध्ये मुकुंदराजांनी विवेकसिंधु हा पहिला मराठीचा ग्रंथ रचला होता. अशा या मराठी भाषेला
*”परि अमृतातेही पैजा जिंके! ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन!”*
या शब्दात ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त असल्याचे म्हटले आहे. भगवद्गीता सर्वसामान्य लोकांस समजावी म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थदीपिका या ग्रंथाचे लेखनही मराठी भाषेतच केले आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी लिळाचरित्र या पद्म चरित्रग्रंथाचे लेखन मराठीत केले…..आणि त्यातूनच मराठीची गतिमानता…सहजसौंदर्य…नादमाधुर्य….गोडवा दिसून आला.
ती आली…नाना रंग नाना गंध घेऊनी….सुरेल शब्दांची रसाळ गोमटी फुले माळुनी…संत साहित्य…वाङ्मयाची कंठी ठुशी सजवुनी…. कथा, काव्य, लेख, संगीत..कादंबरीची आभूषणे लेवुनी….. सर्वांग सुंदर असणाऱ्या विविधांगी साहित्याने नटलेल्या मराठी भाषेला गुलाबाने गुलकंदाचा गोडवा..अन बकुळीने अनंतकाळ उधळीत राहणारा सुगंध बहाल केला…. उगवत्या रवीने डोंगराच्या आडून सोनेरी किरणांचा ताज टेकडीवर ठेवावा आणि डोंगर सोन्याने मढवून टाकावा….असा सोनेरी मुकुट परिधान केला आहे तो संत महात्मे….लेखक, कवी, आदी साहित्यिकांनी…संत एकनाथांची भागवत ग्रंथ रचना…त्यातील बोलीभाषा… लयबद्धता …यामुळे त्यावेळची मराठी भाषा आजच्या पिढीलाही तितकीच आपलीशी वाटते…

*उकळलेल्या दुधावर…*
*आटून येते दाट साय…*
*जोडाक्षरांनी सजलेली…*
*आवडते मज मराठी माय..*

इ. स. ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, पाकृत अपभ्रंश होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवनबेळगोळ येथिल शिलालेखावर सापडले, ते शके ९०५ मधील असून ते वाक्य म्हणजे *श्री चामुंडेराये करविले*. असा हा सातपुडा पर्वत रांगांपासून पश्चिमेला कावेरी….उत्तरेस दमन पासून दक्षिणेला गोव्यापर्यंत मराठी भाषेचा विस्तार झालेला आहे. “डोंगरदऱ्या….पर्वतरांगा…
जिने केल्या पादाक्रांत…
गड.. किल्ले… शिखरांस…
तिने दाविला मराठी प्रांत..
अशा डोंगररांगा, गड किल्ल्यांवर राहणाऱ्या कणखर, राकट माणसांची कणखर तितकीच मधाळ भाषा म्हणजे माझी माय मराठी…
*शब्द शब्द ओघळावा मुखातुनी…. जणू थेंब अमृताचा …*
*ज्या शब्दांची अवीट गोडी…तो शब्द मराठीचा..*
काळानुरुप अवीट गोडी असणाऱ्या मराठी भाषेत बदल होत गेले….शिवरायांच्या काळात आज्ञापत्र मराठीत लिहिली गेली….पेशवे काळात मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसले….त्यानंतर मराठी भाषा ही मुख्य मराठी…अहिराणी मराठी…वऱ्हाडी मराठी…मालवणी मराठी….कोल्हापुरी मराठी अशी पोट प्रकारांमध्ये विखुरत गेली…परंतु….प्रत्येक प्रकारात मराठी भाषा ही हळद लागलेल्या नव्या नवरीसारखी नटली…सजली…कधी लाजली… कधी मुरडली….तर कधी आपल्याच हातांवरील मेहंदीतील मोरांच्या नक्षीत स्वतःलाच हरवून बसली…माझी मराठी….मुखा मुखांमधून बहरली….मोहरली…प्रांता प्रांतांमध्ये विभागली…पसरली.. तरीही…..हिमालयात उगम पावलेली नदी जशी जशी वाहत प्रांत अन प्रांत पादाक्रांत करत…जिथे जाईल तिथे आपल्या अमृताने भूमीला हिरवीगार करते….फुला फळांचे मळे फुलविते….अगदी तशीच माझी मराठी…जिथे गेली तिथे तिथे…प्रत्येकाला भावली…पसंतीस उतरली…कित्येकांच्या लेखणीला धार दिली….कोणास नाव दिले..कोणास गाव दिले…तर कधी अक्षर बनून….पुस्तकात आपले गाव वसविले…

*माझ्या माय मराठीची महती…*
*काय सांगावी आपुल्याच मुखी…*
*शब्दाशब्दात तिच्या वसे सरस्वती…*
*प्रांताप्रांतात उच्चारता दिसे चेहरा सुखी…*

विदर्भ…मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असो वा कोंकण…..प्रत्येक ठिकाणी माय मराठी आपली लयबद्धता कायम ठेवत एक वेगळाच गोडवा निर्माण करते….आणि एक दुसऱ्या प्रांताला वेगवेगळ्या बोलीतील मराठीची आवड निर्माण करते…
मराठीतील आद्य कवी केशवसुतांची….*एक तुतारी दे मज आणुनी…. फुंकीन मी ती तव प्राणांनी…* सामाजिक जाणिव देणारे मर्ढेकर, महात्मा फुलेंचा “शेतकऱ्यांचा आसूड” मधून शेतकऱ्यांचे झालेले हाल…वि.स.खांडेकर, पु ल, ग.दि.मा., वि.स फडके अशा एकापेक्षा एक मराठी रचनांमधून, नाटक, संगीत, सामाजिक शास्त्रांमधून मराठी भाषा मनामनात जागृत ठेवली…आज मराठी भाषा…..मधमाशांच्या पोळ्यातून मधाळ मध गळून ओठांवर माधुर्य देतो तशीच साहित्यिकांच्या शब्दाशब्दांमधून रसभरीत…गंधित होऊन स्रवते आहे…आपल्या शब्दांच्या जादूने मनाला मोहून टाकते…गुलाबाच्या बागेत रंगबिरंगी गुलाब पुष्प फुलतात…त्यांचा आकार…. रंग भुंग्यानाही भुरळ पाडतो…परंतु कुठेतरी एखादा नाजूकसा मोगरा फुलतो… वेड्यावाकड्या पाकळ्या…आणि पांढराशुभ्र असा एकच रंग असला तरी आपल्या सुगंधाने…मोगरा भुंग्यालाही भुरळ घालतो…आणि भुंगा…फुलपाखरे मध शोषण्यासाठी मोगऱ्याच्या भोवती पिंगा घालतात….
अगदी तसाच….मराठी भाषेच्या गोडव्याने….श्रवण करणारा प्रत्येक जण मोहित होतो…समजत नसलेला माणूसही….प्रसन्नतेने ऐकतो…आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्यच…. मराठीच्या अवीट गोडीचा दाखला देऊन जातं….
*महाराष्ट्राच्या मातीत रुजली*
*माझी लाडकी माय मराठी…*
*बीज अंकुरले..उतरले लेखणीत*
*भाषा मराठी जपण्यासाठी…*

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा