म्युझियम ऑन व्हील्समधील दुर्मिळ वस्तूंचा खजिना पाहून विद्यार्थी भारावले !
कुडाळ
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या फिरते संग्रहालय अर्थात म्युझियम ऑन व्हील्सच्या माध्यमातून प्राचीन व ऐतिहासिक वस्तूंची साक्ष देणारा खजिना कुडाळ येथील बँ.नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह अन्य शाळाच्या विद्यार्थांनी बुधवारी प्रत्यक्ष अनुभवला. आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यार्थांना या दुर्मिळ वस्तू पाहण्याची संधी मिळाली. या संग्रहालयाची फिरती बस कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघातील विद्यालये व शाळांमध्ये दाखल होण्याबाबत आयोजन करावे, अशी मागणी या संग्रहालयाच्या व्यवस्थापकाकडे आमदार श्री नाईक यांनी केली होती.त्यानुसार सदर बस मालवणमधून आज कुडाळ येथील बँ नाथ पै विद्यालयात दाखल झाली. शिवसेना ठाकरे गट नगरसेवकांनी या फिरत्या संग्रहालयाचे स्वागत केले. या उपक्रमाची सुरुवात बँ.नाथ पै विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव सातपुते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. विद्यार्थी व पालक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बँ.नाथ पै विद्यालयातील विद्यार्थ्यांसह कुडाळ – कविलकाटे ,कुंभारवाडा व अन्य काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाला भेट देत आतील वस्तू जाणून घेतल्या.शिक्षक ,पालक व नागरिकांनीही या संग्रहालयाला भेट दिली.या म्युझियम ऑन व्हील्स टीमने विद्यार्थ्यांना प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तूंची माहिती दिली. या संग्रहालयात शिवकालीन नाणी ,दागिने , वस्त्र ,भांडी तसेच प्राचीन दगडी व धातूची हत्यारे, बाहुबली प्रतिकृती,मूर्ती, लघुचित्र, चाकावरील पक्षाची मृण्मुर्ती, चंद्रगुप्त दुसरे यांचे नाणे अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. या संग्रहालयातून आदिमानवाच्या( पूर्वज ) जीवन शैलीची कल्पना आली.