*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय माकोणे अप्रतिम काव्यरचना*
*स्वप्नात आली माझी शाळा*
नाद घुमला पुन्हा एकदा,
घंटा जणु वाजली.
एक दिवस स्वप्नात माझ्या
माझी शाळा आली.
गरबड झाली, धावपळ झाली,
कसले टिफीन, अन कसले पाणी.
पाठीवरती दप्तर घेऊन,
तसेच निघालो आम्ही अनवाणी
धिंगाणा मस्ती पुन्हा एकदा,
घेतली आम्ही करून.
येता जाता गुरुजींना आम्ही,
बघत होतो चोरून.
जिवाचे जिवलग तेथे मला,
पुन्हा एकदा भेटले.
एका गोळीचे तुकडे आम्ही
वाटुन वाटुन घेतले.
सगळ्या गावाला तेव्हा,
एकच शाळा होती.
शाळेबरोबर ही गावकऱ्यांची
जुळली होती नाती.
थरथर कापलो आम्ही,
जेव्हा सावरली गुरुजींनी बाही.
चुकूनही बाप आमचा,
कधी शाळेत आला नाही.
गणित चुकले बसली माझ्या,
धपकन कानाखाली.
त्या धपाट्याने जाग आली,
शाळा माझी मधेच सुटली.
शिनभाग माझा सगळा,
हलका करून गेली.
एक दिवस स्वप्नात माझ्या
माझी शाळा आली……
✍️ संजय माकोणे… अमळनेर ता. नेवासा
Wow ! Nice