You are currently viewing नव्या युगाची फॅशन – नऊवारी साडी

नव्या युगाची फॅशन – नऊवारी साडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुचिता विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*नव्या युगाची फॅशन – नऊवारी साडी*

 

साडेचार ते आठ मीटर (पांच ते नऊ वार ) लांब व दोन ते चार फूट रुंद सलग वस्त्र साडी म्हणून वापरतात. साडी भारतीय स्त्रीचे मुख्य वस्र मानले जाते.जगातील सर्वात जुने व लांब वस्त्र म्हणून साडीला मान मिळतो

साडीचे पांच वारी व नऊ वारी असे मुख्य दोन प्रकार आहेत .सणासुदीला सांस्कृतिक कार्यक्रमात व हौस म्हणून नऊवारी साडी वापरतात . आज आपण नऊवारी साडी बद्दल जाणून घेवूया.

नऊवारी साडी नऊ यार्ड (वार ) लांब असते .ही साडी नेसण्याची पद्धत महाराष्ट्रीयन धोतरासारखीच

आहे.साडीचा जो भाग खोचून मागील बाजूस बांधला जातो त्याला काष्टा म्हणतात.हिला सकच्छ साडी किंवा काष्टा साडी असेही म्हणतात .ही साडी परिधान करताना आतून पेटीकोट घालावा लागत नाही म्हणून हिला अखंड वस्त्र असेही म्हणतात .

ही साडी घालून किती तरी वीरांगना युद्ध लढल्या होत्या .

 

नेसायची पद्धत.

 

ही साडी नेसायची पद्धत जातीनिहाय व वातावरणानुसार भिन्न भिन्न आहे . ब्राह्मण स्री नऊ वारी साडी नेसताना तिला उजव्या कमरे जवळ गांठ मारते तिला ब्राह्मणी साडी असे म्हणतात.रायगड जिल्ह्यातील आगरी स्त्री ही साडी गुडघ्या पर्यंतच नेसते तिला अद्व पातळ असे म्हणतात .रायगड रत्नागिरीतील कुणबी स्त्री जेंव्हा ही साडी नेसते तेंव्हा तिला उपरती म्हणतात.उपरती आणि अद्व साडीचे वैशिष्ट म्हणजे तिला गांठ न मारताही ती शरीरावर फिट्ट बसते.ब्राह्मणी साडी पायापर्यंत नेसली जाते व साडीचे बॉर्डर समोर व मागील काष्ट्यात ठळक पणे दिसून येते. पेशवाईत ही साडी खूप प्रसिद्ध झाली.स्त्रीचे दोन्ही खांदे झाकले जात असल्यामुळे ह्या पारंपरिक साडीतील स्त्री कडे आदराने पाहिले जाते . कोळी स्त्रीया अजूनही ही साडी वापरताना दिसतात. नवीन युगात देखील ही साडी लुगडे म्हणून प्रसिद्ध आहे.जुन्या महाराष्ट्रीयन स्त्रिया अजूनही लुगडे वापरताना दिसतात. मराठी संस्कृती जीवित राहावी असे वाटत असेल तर नवीन मुलींनीही नऊवारी साडी वापरावी . नृत्य स्पर्धा लावणी फॅशन इंडस्ट्री मध्ये नऊवारीची मागणी वाढत आहे.नवीन मुलींमध्ये नऊवारी साडी नेसण्याची फॅशन आली आहे. जगात सर्वात लांब व सुदंर वस्त्र म्हणून नऊवारीचे कौतुक होतेय.नऊवारी नेसणे थोडे वेळखाऊ व अवघड असल्यामुळे त्यावरील उपाय म्हणून रेडी शिवलेल्या नऊवारी साड्या बाजारात उपलब्ध आहेत. लहान लहान मुली व कॉलेज कन्या स्नेह संमेलन स्पर्धा वाढदिवस धार्मिक सण व सांस्कृतिक कार्यक्रम सूत्र संचालन ह्या साठी नऊवारी साडीला प्राधान्य देताना दिसत आहेत.ही शक्यतो शिवलेली साडी मोठ्या शहरांमध्ये भाड्याने उपलब्ध आहेत. जस्ट डायल ला 8888888888 ह्या क्रमांकावर फोन केल्यास व शहराचे किंवा त्या शहरातील विभागाचे नाव सांगितल्यास ते भाड्याने नऊवारी साडी देणाऱ्या दुकानाचे फोन नंबर व पत्ते एस एम एस किंवा व्हॉटसअप द्वारे आपल्याला कळवतात. हौस म्हणून नववधू ही साडी लग्नात वापरताना दिसतात. सुती सिल्क व पैठणीत ही साडी उपलब्ध आहे.

 

मुख्य प्रकार – – –

मस्तानी

जिजाऊ

म्हाळसा

देवसेना

त्रिवेणी

ब्राह्मणी

 

चित्रपटातील नऊवारी साडी

 

बऱ्याच बॉलीवुड पटात नट्या गाण्यात नऊवारी साडीत शोभून दिसल्या . त्यातील बहुतेक हिंदी गाणे प्रसिद्ध झालेत. साडीचा पदर खांद्यावर न घेता कमरेभोवती गुंडाळून नाकात नथ कपाळावर बिंदी अशा रुपात नट्या नटलेल्या दिसल्यात. सैलाब मधील ‘ हमको आजकल है इंताजार हे माधुरीचे गाणे चिकणी चमेली तील कतरिना कैफ मला जाऊ दे हे फेरारी की सवारीतील विद्या बालन बाजीराव मस्तानी तील प्रियांका चोप्रा व दीपिका पदुकोण नऊवारी साडी परिधान करून खूप सुंदर दिसल्या. जुन्या नव्या मराठी चित्रपटात लावणी नृत्य करताना नऊवारीतील नट्या खूपच सुंदर दिसल्या . मराठी संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर नव तरुणींनी नऊवारी साडीचा जरूर वापर करावा असे मी आवाहन करते .

 

सुचिता विलास कुलकर्णी

मीरा रोड

९२२०३४०५०६

प्रतिक्रिया व्यक्त करा