आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून किल्ले सिंधुदुर्गवर भगवा ध्वजाचे नुतनीकरण
छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्याची गेल्या काही वर्षात वारा, पाऊस व खारी हवा यामुळे दुरावस्था झाल्याने आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून या लोखंडी झेंड्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तातडीने हे काम करण्यात आले.
किल्ले सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वारासमोर लोखंडी उंच असा भगवा झेंडा आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून काही वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. याचे शिवप्रेमींकडून स्वागत झाले होते. मात्र वारा, पाऊस व खारी हवा यामुळे या झेंड्याची काहीशी दुरावस्था झाली होती. अलीकडेच किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात निर्माण केलेल्या सिंहासनाच्या कामाच्या पाहणीसाठी आमदार नाईक आले असता त्यावेळी शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिकांनी आम. नाईक यांचे झेंड्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले होते. याबाबत आम. नाईक यांनी तातडीने लक्ष घालत या झेंड्याची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम शिवजयंती उत्सवाच्या आधी पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे याबाबत शिवप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.