लिंग समभाव संचेतना कार्यशाळेचे कुडाळ येथे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी
भेदभाव, असमानता हे शब्द जरी मोठे असले तरी या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे. आहे मुळात आपल्या घरापासून भेदभाव, असमानता याचा अर्थ आणि घरात होणाऱ्या घडामोडी यामधून शोधला पाहिजे, असे मत सम्यक संस्थेचे आणि जेंडर स्पेशालिस्ट सम्म्यक आनंद पवार यांनी येथे व्यक्त केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण उद्यम (नव तेजस्विनी) कार्यक्रमांतर्गत कुडाळ येथील दुर्वांकुर हॉल येथे पुरुष मास्टर ट्रेनर यांच्याकरिता लिंगसमभाव संचेतना या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आणि दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी.काटकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, स्वाधार सीएमआरसी संस्थेच्या अध्यक्ष मानसी धुरी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयोगिनी उपस्थित होत्या.
कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री.पवार म्हणाले, कुठेही परिवर्तन हे स्वतःच्या घरापासून सुरू होत असतं. लिंग समभाव संचेतना कार्यशाळा का घ्यावी लागली ? याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. महिला विविध क्षेत्रात प्रगती करीत आहेत. नोकरी, व्यवसाय, राजकारण अशा प्रमुख ठिकाणी काम करताना दिसतात हे परिवर्तन आहे. पण, मानसिक स्थितीतून परिवर्तन झाले आहे का? याचा विचार झाला पाहिजे आणि त्यामुळेच लिंग समभाव संचेतना ही कार्यशाळा त्यासाठी आहे. आपण सर्व समान आहोत जशा पुरुषाला भावना आहेत अशा महिलेला भावना आहेत आणि एकामेकाच्या भावना जपणं एकमेकाला सहकार्य करून प्रगती करणे म्हणजेच लिंग समभाव होय. मात्र, अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा आपण दिंडोरा पिटत आहोत हे कुठेतरी कमी झाले पाहिजे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे भेदभाव आणि असमानता याचे अर्थ समजावून घेणे महत्त्वाचे आहे त्यावेळीच समानता आणि समभाव नांदू शकतो असेही ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री.सातपुते म्हणाले, पुरुष आणि स्त्री हा नैसर्गिक लिंग भेद असला तरी समभाव निर्माण करणे हे आपल्या हाती आहे. तसाच तृतीयपंथीयांच्याबाबतही विचार होणे आवश्यक आहे. समाजात अजूनही पुरुषी अहंकार आहे, तो कमी झाला पाहिजे समाज काय म्हणेल यापेक्षा मला काय करायला पाहिजे हे जास्त महत्त्वाचे आहे. समाज काय म्हणेल यापेक्षा आपण काय करतो याकडे लक्ष देणे आणि त्याची सुरुवात करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संस्काराचे कारण पुढे करून अनेक जुन्या रुढी, परंपरा अंगीकारल्या जात आहेत किंवा त्या लादल्या जात आहेत हे काळानुरुप बदलणे आवश्यक आहे. समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी स्वत: पासून सुरुवात झाली पाहिजे.
जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. काटकर म्हणाले, अनेक कायदे महिलांसाठी आहेत आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळू शकतो आणि त्यासाठीच अशा प्रकारचे अनेक उपक्रम शासन हाती घेत आहे. महिलांचा जेव्हा सर्वांगीण विकास होईल तेव्हाच मानवी निर्देशांक वाढेल असे सांगून त्यांनी महिला विषयी असणाऱ्या योजना, कायदेयाबाबत सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महिला आर्थिक विकास महामंडळाचे श्री. काळे यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील ३० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.स्वाधार संचलित साधन केंद्र कुडाळच्या व्यवस्थापक प्रितम केरवडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर माविमच्या लेखाधिकारी आशालता जमने यांनी सर्वांचे आभार मानले.