You are currently viewing फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

सावंतवाडी

मलंकारा आर्थोडॉक्स चर्च कौन्सिल ऑफ बॉम्बे संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी उत्साहात संपन्न झाला.
या संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मेट्रोपॉलिटन डायोसिस ऑफ बॉम्बेचे एच जी गिवर्गिस मार कुरीलोस, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीण कुमार ठाकरे, फेडरल बँक सावंतवाडी शाखा व्यवस्थापक योगेश सावंत,
सावंतवाडी तालुका. सहाय्यक आरोग्य अधिकारी शंकर परब, चराठा सरपंच प्रचिती कुबल, सावंतवाडीचे पॅरिस प्रिस्ट फादर मिलेट डिसोजा, संस्थेचे कार्यकारी अधिकारी फादर अब्राहम व उपकार्यकारी अधिकारी अब्राहम जोसेफ, फिरत्या वैद्यकिय पथकाचे डॉ चेतन परब, अँड्र्यू फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.
या संस्थेच्यावतीने अतिदुर्गम भागातील घारपी, असनिये, तांबोळी, भालावल, कोनशी, दाभिल, सरमळे या गावात प्रत्येक आठवड्यात दोन दिवस फिरते वैद्यकीय पथक जाऊन वैद्यकीय डॉक्टर मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांना मोफत उपचार करून औषधे देण्यात येणार आहेत.
यावेळी डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी या संस्थेने स्वामी विवेकानंदा प्रमाणे अध्यात्मिकतेसह राष्ट्रसेवा पर्यायाने मानव सेवा स्वीकारला असून निःस्वार्थ भावनेने हे फिरते वैद्यकीय पथक सावंतवाडी तालुक्यातील दुर्गम गावात सुरू होत आहे. हा प्रयत्न स्वामी विवेकानंदांच्या मार्गानेच पुढे जाईल असा आशावाद व्यक्त करून ही सेवा पूर्णपणे मोफत असल्याने रुग्णांनी याचा लाभ घ्यावा आणि स्थानिक प्रशासनासह ग्रामस्थानी या संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन केले. तर गिवर्गिस मार कुरीलोस यांनी शतकापूर्वी मार अल्वारिस यांनी सावंतवाडीतील दुर्गम भागात कार्य केले असुन त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे फिरते वैद्यकीय पथक सुरू करताना आनंद होत आहे. त्यामुळे जनतेने मनात कुठलीही शंकाकुशंका न ठेवता याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी शंकर परब, चराठा सरपंच प्रचिती कुबल, फादर मिलेट डिसोजा फादर अब्राहम, डॉ चेतन परब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चराठा उपसरपंच अमित परब, भालावल सरपंच समीर परब, कोनशी तांबुळी सरपंच वेदिका नाईक, उपसरपंच जगदीश सावंत, माजी सरपंच अभिलाष देसाई, सरमळे सरपंच विजय गावडे, कोनशी सरपंच साधना शेट्ये, कृष्णा गवस, दीपक गावडे सागर गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेरोनिका डिसोझा व आकांक्षा शिंदे तर आभार जेरोन जॉन यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा