*एखाद्या प्रसार माध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते*
*शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा सवाल*
*कर्जत तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश*
*शिवसेना नेते सुभाष देसाई,खा.अरविंद सावंत,आ.वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थितीत*
प्रसार मध्यमे लोकशाहीचा चौथा आणि महत्वाचा स्तंभ आहेत. दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकली गेली आहे. एखाद्या प्रसार माध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? म्हणजेच काय तर आम्ही वाटेल ते करू परंतु तुम्ही आवाज उठवायचा नाही आवाज उठवला तर चिरडून टाकू हि एक पार्श्वी वृत्ती आपल्या देशात फोफावायला बघतेय आपण वेळेमध्ये एकत्र आलो नाही, आपली ताकद वाढविली नाही तर पुरा देश खावून टाकेल असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते व
शिवसेना नेते सुभाष देसाई , खासदार अरविंद सावंत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रियाज बुबेरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना भवन मुंबई येथे उद्धवजी ठाकरे यांनी शिवबंधन बांधून प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील,रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर,उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यासंह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
उद्धवजी ठाकरे पुढे म्हणाले, गेले पाच सहा महिने मातोश्री आणि शिवसेना भवन येथे शिवसेना पक्ष प्रवेशासाठी,भेटीसाठी कार्यकर्त्यांची रीघ लागलेली आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाले हे पसंत नाही आणि हे असेच सुरु राहिले तर देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही. म्हणून देश वाचविण्यासाठी लोक शिवसेनेसोबत येत आहेत. दोन तीन दिवसापूर्वी मी एका उत्तर भारतीयांच्या बैठकीत गेलो त्याप्रसंगी देखील सांगितले की, त्यावेळची लढाई होती ती स्वातंत्र्य मिळविण्यासाठीची लढाई होती.आता हि स्वातंत्र्य टिकवायची लढाई आहे. गुलामगिरी ती गुलामगिरीच असते ती परकीयांची असेल किंवा स्वकीयांची असेल. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जात आहेत. प्रधानमंत्री उद्घाटने करत आहेत. झेंडे दाखवत आहेत. त्याच वेळेला माझी भारतमाता पुन्हा माझी गुलाम कशी होईल यादिशेने त्यांची पाऊले चालली आहेत. ती पाऊले वेळेत ओळखून आपण एकत्र आले पाहिजे आणि तसा तुम्ही निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. मुस्लीम बांधव भगिनी शिवसेनेत आले म्हणून शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका होईल. मात्र टीकाकारांना मी सांगू इच्छितो कि, काही दिवसापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत हे मशिदीत गेले ते काय शोधून आले? जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला हिंदुत्व शिकवले ते म्हणजे “राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व” आणि देशद्रोही असेल तो कोणीही असेल त्याचा जात,पात,धर्म हा देशद्रोहीच त्याला आमचा विरोध असेल त्या विचाराने आपण एकत्र आलात हि तुमची ताकद खूप मोठे बळ देणारी आहे. हे बळ आणि एकजूट देशाला दिशा दाखवणारी असेल असे त्यांनी सांगितले.