You are currently viewing कारण तुझं रजस्वला होणं

कारण तुझं रजस्वला होणं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित (पंडित) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*..कारण तुझं रजस्वला होणं*

माझी बाई,
कधीच नव्हतं
इतकं सहज सोपं
तुझं रजस्वला होणं.
तप्त लाव्हा रसाला उकळी फुटावी आणि वर्षानुवर्ष पृथ्वीच्या पोटात निपचित पडून राहिलेल्या
आगीच्या लोटाने भडभडून स्वतःलाच ओकून टाकावं…
तस्सं अगदी तस्संच,
पायावरून उष्ण ओल्या रक्ताचे ओघळणारे पाट पाहून
एकाच वेळी तुझ्या
मनात उठलेलं काहूर
उडालेला गोंधळ …
तुझ्या शरीराची आणि
मनाची होणारी घालमेल
अजून नीटशी स्वतःलाच
समजत नाही तोवरच
कुणाच्या नजरेला हा
लाल रंग पडू नये म्हणून
चाललेली तुझी धडपड,
हो हे खरे की तुला आत्ता हे लाजिरवाणं वाटतंय
पण तू विसरू नकोस की
आता तर चढतेय तुझ्या अंगावर हिरव्या सृजनाचं लेणं
तू सृष्टीच्या अस्तित्वाला
सांभाळणारी बनतेस धुरा
तुझ्या नसानसांना फाडून
उधळत निघालेल्या कळा
पुरावे देत आहेत की
युग बदलली, कर्ते बदलले,
काळ बदलला…
पण वयात आलेल्या योनीची पीडा तशीच आहे …युगानुयुगे.
टपून बसलीत गिधाडं
याच संधीची वाट बघत
पण म्हणून… पण म्हणून
तू घेऊ नकोस विस्कटून स्वतःला मिटून घेऊ नकोस तुझे पंख.
हा नवचैतन्याचा झरा
जोजव तुझ्या देहात.
बाईपणाचे भोग म्हणून
पाहूच नकोस तू हा लाल रंग
तुला नहाण येणं म्हणजे नसते कावळ्याची शिवाशिव.
भले बंद होऊ देत
मंदिराचे दरवाजे
डावलूदेत संस्कृती रक्षकांचे जथ्थे
.. पण हा तर आहे तुझ्या
अस्तित्वाचा गाभा
तुझ्या अंतरंगातल्या
सृजनशक्तीचा सोहळा
निवड केलीये तुझी
या अगम्य अफाट गूढ शक्तीने याचसाठी की ,
तू आणि फक्त तूच आश्वासक होतीस आणि आहेस कायमच
या शक्तीला न्याय देण्यासाठी
करू नकोस स्वतःच्या
शरीराची हेटाळणी
वाटू देऊ नकोस घृणा
कारण तुझं रजस्वला होणं
कधीच नव्हतं
इतकं सहज सोपं
आणि एक ठेव लक्षात
सोप्या गोष्टींनी मोठेपण कुठं सिद्ध होत असतं का?

©®अंजली दीक्षित-पंडित
९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा