You are currently viewing भारताचा एक डाव आणि १३२ धावांनी दिमाखदार विजय

भारताचा एक डाव आणि १३२ धावांनी दिमाखदार विजय

*भारताचा एक डाव आणि १३२ धावांनी दिमाखदार विजय*

*रवींद्र जडेजा सामनावीर तर अश्विनने गाठला ४५० बळींचा टप्पा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळविला. टीम इंडियाने अडीच दिवसांत कांगारूंचा ‘निकाल’ लावला. भारताने मालिकेत आता १-० ने आघाडी घेतली. बलाढ्य समजली गेलेली ऑस्ट्रेलियाची फलंदाजी तीन दिवसांत ढेपाळली. भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ७० धावा, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पाच विकेट्स दुसऱ्या डावात दोन विकेट्स अशी अष्टपैलू कागमिरी करणाच्या रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने ३७ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत त्याला शानदार साथ दिली. अक्षर पटेलने एक फलंदाज बाद केला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने भारताचा विजय सुकर झाला. स्टिव्हन स्मिथ (५१ चेंडूंत २५) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहण्यात यश आले नाही.

भारताने दुसऱ्या डावात २२३ धावांची आघाडी घेतल्यानंतर कांगारूंनी दुसरा डाव सुरू करताच भारताच्या फिरकी गोलंदाजीपुढे कांगारूंनी अक्षरशः लोटांगण घातले. अश्विनने उस्मान ख्वाजा (९ चेंडूंत ५), डेव्हिड वॉर्नर (४१ चेंडूंत १०) आणि मॅट रेनशॉ (७ चेंडूंत २) यांना बाद केले. जडेजाने मानस लाबुशाने (२८ चेंडूंत १७) यांना बाद केले. अश्विनने पीटर हैंड्सकॉम्बला (६ चेंडूंत ६ धावा) बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था १७.२ षटकांत ५ बाद ५२ धावा अशी केली. निम्मा संघ गारद झाल्यानंतर कर्णधार पैंट कमिन्स (१३ चेंडूंत १) आणि अॅलेक्स केरी (६ चेंडूंत १०) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनने केरीला त्रिफळाचीत केले. जडेजाने कर्णधार कमिन्सला बाद करत भारताला विजयाच्या जवळ नेले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव प्रथम १७७ धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर भारताने पहिल्या डावात चारशे धावा करून पहिल्या डावात २२३ धावांची मजबूत आघाडी घेतली. त्यानंतर कांगारूंना दुसऱ्या डावात अवघ्या ९१ धावांत गुंडाळले. पहिल्या डावात कांगारूंनी ६३.५ षटके आणि दुसऱ्या डावात ३२.३ षटकेच तग धरला.

या सामन्यात २१२ चेंडूंत रोहित शर्माने सर्वाधिक १२० धावा केल्या. अक्षर पटेलने ८४; तर रवींद्र जडेजाने ७० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने सर्वाधिक सात विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सने दोन विकेट्स घेत त्याला साथ दिली. नॅथन लियोनने एक फलंदाज बाद केला.

भारताने सामन्याच्या तिसन्या दिवशी ७ बाद ३२१ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फीने जडेजाचा ७० धावांवर त्रिफळा उडविला; मात्र भारताचा डाव लवकरात लवकर गुंडाळण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर मोहम्मद शमी (४७ चेंडूंत ३७ ) आणि अक्षर पटेल यांनी पाणी फेरले. या दोघांनी नवव्या विकेटसाठी अर्धशतकी (५२) भागीदारी केली. अखेर मर्फीने शमीला बाद केले. शमी बाद झाला त्यावेळी भारताच्या ३८० धावा झाल्या होत्या. त्यानंतर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज या शेवटच्या जोडीने आणखी २० धावा जोडल्या. अक्षर पटेलचे शतक १६ धावांनी हुकले. पॅट कमिन्सने त्याचा ८४ धावांवर त्रिफळा उडविला आणि भारताचा पहिला डाव चारशे धावांवर संपुष्टात आला.

नागपूरच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना अॅलेक्स कॅरीचा बळी मिळवून आर. अश्विनने आपल्या कसोटी कारकीर्दीतले ४५० बळी पूर्ण केले. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये आता ४५० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन सामील झाला आहे. यात त्याचा नववा क्रमांक लागला आहे. मुथय्या मुरलीधरन, श्रीलंका (१३३ कसोटी, ८०० बळी), शेन वॉर्न, ऑस्ट्रेलिया (१४५ कसोटी, ७०८ बळी), जेम्स अँडरसन, इंग्लंड (१७७ कसोटी, ६७५ बळी), अनिल कुंबळे, भारत (१३२ कसोटी, ६१९ बळी), स्टुअर्ट ब्रॉड, इंग्लंड (१५९ कसोटी, ५६६ बळी), ग्लेन मॅग्राथ, ऑस्ट्रेलिया (१२४ कसोटी, ५६३ बळी), कर्टनी वॉल्श, वेस्ट इंडिज (१३२ कसोटी, ५१९ बळी), नॅथन लेयॉन, ऑस्ट्रेलिया (११६ कसोटी, ४६० बळी) आर. अश्विन, भारत (८९ कसोटी, ४५२ बळी).

आर. अश्विनने आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात नोव्हेंबर २०११ ला केली होती. दिल्लीला तो आपला पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळला होता. त्या पहिल्याच कसोटीत पदार्पण करताना त्याने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात ८१ वर ३ आणि दुसऱ्या डावात ४७ वर ६ असे एकूण ९ बळी मिळवून भारताला हा सामना ५ विकेट्सने जिंकून देण्यासाठी अशी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. अश्विनची ही सुरुवात त्यानंतर दीर्घकाळ तशीच बहरत राहिली. आता वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने आपला ८९ कसोटी सामन्यांचा प्रवास अनुभवताना त्यात एकूण ४५२ बळी मिळवले आहेत. भारतासाठी कसोटीतली ही अनिल कुंबळेनंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

अश्विनच्या बाबतीत सर्वात मोठी बाब म्हणजे, भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त मॅन ऑफ दी सीरिजचा किताब अश्विनलाच मिळवता आला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत खेळलेल्या एकूण ३६ मालिकांमध्ये भारतातर्फे सर्वाधिक ९ वेळा मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार पटकावला आहे.

अश्विनच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, एका कसोटीत ५ बळी आणि शतक ठोकण्याचा मान अश्विनने तब्बल तीन वेळा मिळवला आहे. नोव्हेंबर २०११ ला त्याने वानखेडेवर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळताना १०३ धावा आणि १५६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी मिळवले होते. त्यानंतर जुलै २०१६ ला नॉर्थ साऊंडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना ११३ धावा आणि ८३ वर ५ बळी अशी कामगिरी नोंदवली होती. फेब्रुवारी २०२१ ला त्याने इंग्लंडविरुद्ध चेन्नईला खेळताना १०६ धावा आणि ४३ वर ५ बळी असं योगदान दिलं होतं. ही अश्विनची महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. अश्विनने भारतीय कसोटी संघासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. अजूनही तो वयाच्या ३७ व्या वर्षी मैदानावर त्याच जुन्या आत्मविश्वासाने झुंज देताना पाहायला मिळतोय. त्याचे हे कसोटीतले सर्वोत्तम योगदान भारतीय क्रिकेटला कधीच विसरता येणार नाही.

तिथे दुसर्‍या बाजूला विराट कोहली संघावरचा भार दिवसेंदिवस वाढवत आहे. तो फलंदाजीसाठी मैदानात उतरतानाच पुढचे तीन फलंदाज पॅव्हिलीयनमध्ये तयार असतात. ही सूचक भूमिका त्याने आणि निवड समितीने लक्षात घेतली पाहिजे.

*जडेजाला एक डी-मेरिट पॉइंट आणि मॅच फीच्या २५ टक्के दंड*

नागपूर कसोटीत सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या रवींद्र जडेजावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कडक कारवाई केली. चेंडूशी छेडछाड प्रकरणी आयसीसीने जडेजाला एक डी-मेरिट पॉइंट दिला आणि त्याला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावला.

गोलंदाजी करताना जडेजा आपल्या बोटावर क्रीम लावत असताना त्याच्या हातात एक चेंडूही होता. अशा स्थितीत आयसीसीच्या नियमांनुसार त्याला दोषी मानण्यात आले. परवानगीशिवाय बोटाला पेनकिलर क्रीम लावल्यामुळे जडेजावर ही कारवाई करण्यात आली. नागपूर कसोटी संपल्यानंतर आयसीसीने एक निवेदन प्रसिद्ध करून जडेजाला आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरविले.

या घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली. बोर्डाच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, “बोटातील वेदना कमी करण्यासाठी हे मलम आहे. जडेजाने गुन्हा कबूल केला आणि एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीच्या अँडी पायक्रॉफ्टने प्रस्तावित केलेला दंड स्वीकारला. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही.”

*नागपूरच्या खेळपट्टीवर भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह*

अलिकडच्या काळात कसोटी सामने निकाली ठरत आहेत. तर कित्येक सामने २-३ दिवसांतच संपत आहेत. नागपूर खेळपट्टीवर ह्या निमित्ताने भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह लागलं आहे. भविष्यात येथे सामने खेळवण्या बाबत आंतरराष्ट्रीय समिती नक्कीच विचारमंथन करेल यात शंका नाही. भारतीय गोलंदाजी खरंच इतकी भेदक आहे का? भारतीय गोलंदाज जिथे कधीच सातत्य दाखवत नाहीत तिथे ३ दिवसांत ऑस्ट्रेलिया संघ ३ दिवसांत कसा काय धारातिर्थी पडू शकतो? असे एक ना अनेक प्रश्न या घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला विचारले जातील. त्याची योग्य ती उत्तरच नागपूर खेळपट्टीचं भवितव्य ठरवणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा