कणकवली :
महामार्ग चौपदरी कर्णाचे काम सुरू झाले आणि तेव्हापासून नेहेमीच वादाच्या विळख्यात कायम असलेला हळवल फाटा.! वरवर तेथे अपघात होत आहेत. काहींनी आपले जीव देखील त्या ठिकाणी गमावले आहेत. तर हायवे प्राधिकरण आणी ठेकेदार कंपनी कडून याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल सुधारणेच्या दृष्टीने होत असताना दिसून येत नाहीय. अस असताना कणकवली तालुक्यातील अनेक जणांनी त्या अवघड वळणासंदर्भात प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो यांचे लक्ष वेधले. मात्र प्रशासनाचा निष्काळजीपणा हा जाईना त्यामुळे उद्या हळवल फाटा या ठिकाणी कणकवली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी आज पर्यंत झालेल्या अपघातांबाबत प्रांताधिकारी, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना ई- मेल द्वारे निवेदने तर काही अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली होती. त्यानुसार कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे उद्या १० फेब्रुवारी रोजी हळवल फाटा या ठिकाणी लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करणार असा इशारा विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , १९ जानेवारी रोजी पहाटे हळवल फाटा येथे झालेल्या आराम बसच्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला व काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. मात्र हा व या जागेवर अन्य अपघात होऊन देखील याची जबाबदारी कोणावर निश्चित केली जात नाही व गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे या प्रश्नी प्रशासनाला जाग आणण्या करिता १० फेब्रुवारी रोजी हळवल फाटा येथे आंदोलन करण्याचा इशारा आम्ही कणकवलीकर चे तसेच सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी व पोलिसांना दिले आहे.
या निवेदनात मेस्त्री यांनी म्हटले आहे की, सदर अपघातात व यापूर्वी हळवल फाटा येथे घडलेल्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर व ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अपघात ज्या धोकादायक वळणावर होत आहे त्या ठिकाणी अपघातजन्य परिस्थिती महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून आहे. सातत्याने शासन दरबारी तक्रारी होऊन सुद्धा सदरच्या ठेकेदार कंपनीने अपघात न होण्याच्या दृष्टीने कोणतीही कारवाई न करता सदोष बांधकाम केल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत व जिवीतहानी होत आहे. पर्यायाने राष्ट्राची हानी होत आहे. तरी वारंवार घडणारे अपघात कोणत्या कारणाने होत आहेत याला जबाबदार कोण ? याची संबंधीत यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करून पोलीस निरीक्षक कणकवली यांना संबंधीत यंत्रणेवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश व्हावेत. अशी मागणी श्री. मेस्त्री यांनी केली.
९फेब्रुवारी २०२३ पर्यंत यावर योग्य ती कारवाई न झाल्यास दिनांक १० फेब्रुवारी रोजी शासनाला जाग आणण्याकरीता महामार्गावर हळवल फाटा येथे लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री. मेस्त्री यांनी दिला. दरम्यान कलम १४९ प्रमाणे श्री. मेस्त्री यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून, सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या पूर्ण करून घ्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. परंतु, गेली अनेक वर्ष याबाबत सातत्याने मागणी करून देखील जर मागण्या मान्य होत नसतील तर लोकशाहीत आंदोलन करणे हा सनदशीर च मार्ग नव्हे का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे प्रशासन आता या कडे गांभीर्याने लक्ष देईल की नेहेमीप्रमाणे आपले सोपस्कार पूर्ण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी मात्र होणारे आंदोलन हे प्रशासनाला दखल घ्यायला लावणारे आहे अशा चर्चा देखील शहरात होऊ लागल्या आहेत.