You are currently viewing शिवदृष्टांत

शिवदृष्टांत

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जगदीश साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*

*शिवदृष्टांत*

शिवजयंती जवळ येते म्हटल्यावर लागलीच तयारीला लागलो होतो परंतु……परंतु काल रात्रीच राजे स्वप्नात अवतरले. राजांना समोर बघून विश्वास बसेना माझा की साक्षात स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज आज माझ्या समोर आहेत. थोडा वेळ धक्का बसल्यासारखं राजांकडे बघतच होतो. राजे ही बघत होते परंतु एक ही शब्द न बोलता ते उभे होते. राजांसोबत रायबा देखील आले होते, ते दुरून खुणावत होते राजे आलेत मुजरा कर. तेव्हा लक्षात आलं की आपण राजांसमोर उभे आहोत आणि मुजरा ही नाही केला. राजे असे अचानक आलेत तर आनंदाने इतका भारावून गेलो होतो की साधा मुजरा करायचा ही विसरून गेलो. शेवटी रायबाने खुणावल्या नंतर राजांना मानाचा मुजरा घातला. तेव्हा राजे ही आसनस्थ झाले.


मला तेव्हा काय बोलावं सुचेना राजांनी बोलायला सुरुवात केली शेवटी. राजे बोलत असताना सुद्धा माझा विश्वास बसत नव्हता. की राजे माझ्याशी संवाद साधत आहेत राजांनी बोलायला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी प्रश्न हाच विचारला “बाळांनो, तुम्ही माझी जयंती का साजरी करतात?” म्हटल,”महाराज, १९ फेब्रुवारी म्हणजे आमच्यासाठी खास दिवस तुमचा जन्मदिवस आम्ही कसा विसरेल राजे?” राजे तेव्हा हसले, आणि म्हणाले,”तुम्ही किती जरी माझी जयंती साजरी करत असलात तरी तुम्ही किती मनापासून करतात हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो” राजे असे बोलल्यावर जरा घाबरलो होतो आणि एकदम अंगावर रोमांच उभारले, त्याच आवेगाने रोमांचकारी संयोगाने राजांना विचारले,” राजे आमचे काही चुकले का?” राजे शांत होते पण रायबा म्हणाले,”वाह, आमचे काही चुकले का?, आधी मनाला वाटेल तसे वागायचे आणि म्हणायचे आमचे काही चुकले का?” राजे ही बोलायला लागले,”तुम्ही जयंती साजरी करता आमचा मान ठेवता चांगलच आहे पण एवढे करत असताना काही गोष्टींचे तारतम्य बाळगायला हवे, आम्ही जरी इथे राहत नसलो तरी सुद्धा आमचे लक्ष सर्वत्र असते हे तुम्ही लक्षात ठेवा”.


रायबा म्हणाले,”मागच्या जयंती उत्सवालाच बघितले आम्ही, समोर राजांची मूर्ती स्थापन केलेली असताना आपलीच सर्वसामान्य जनता विशेषतः भावी पिढी घडवणारे आताची युवक मंडळी राजांच्या मूर्तीसमोर सिगारेट ओढत होते शरम वाटायला पाहिजे आपण काय करतोय कोणासमोर उभे आहोत याचे काही भान”.
मी असाच शरमेने मान खाली घालून उभा होतो. पुढे रायबा म्हणाले,”दुसरी आणखी एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली ती म्हणजे महाराजांच्या जयंतीला मोठमोठे बॅनर लावताना दिसतात. अहो, पण त्या बॅनर वर राजांच्या फोटोपेक्षा बाकी कार्यकर्त्यांचे फोटो मोठे असतात. तुमची लायकी तरी आहे का महाराजांसोबत फोटो काढायची?” “जयंती कोणाची आहे आणि तुम्ही फोटो कोणाचे मोठे करून लावतात. अहो, ज्यांना आया बहिणीचा आदर करायची माहित नाही, ज्या गाड्यांवर महाराजांचे फोटो लावून फिरता त्याच गाड्यांवरून तुम्ही महिलांची अब्रू लुटतात, अंगावरील दागिन्यांची चोरी करता, छे”.
मी यावर काही बोलणार तितक्यात महाराजांनी हात वर केला आणि माझे बोलणे थांबवले. राजे बोलले,”या साठी केला होता का आम्ही हिंदवी स्वराज्याचा अट्टाहास?” “जिथे तुम्ही आपल्या भगव्या झेंड्याची सुद्धा आण बाण शान राखत नाही तो आपला भगवा झेंडा एवढ्या जोराने फिरवता की खाली जमिनीवर लोळतो तरी त्याचे गांभीर्य काही तुम्हास जरा ही जाणवत नाही याचीच खंत वाटते. कसे असणार ना? तुम्ही लोक तर दारूच्या नशेत येऊन आमच्यासमोर धिंगाणा घालतात, त्या दारूच्या नशेत तो भगवा फिरवताना कोणाला इजा होते का, कोणाच्या अंगाला लागतो का, याचे जराही भान नाही तुम्हास?”. रायबा म्हणाले,”तो भगवा फिरवताना कोणाला लागला, इजा झाली की त्यातून उसळतात भांडण, वाद, मारामाऱ्या आणि पुन्हा त्यातून निर्माण होतात खून, हत्या.” राजे म्हणाले,”तुम्ही यासाठी सर्वजण आमची जयंती इतक्या उत्साहात साजरी करता का? तुम्हाला धिंगाणा घालता यावा, नाचता यावं यासाठी हवी का तुम्हाला आमची जयंती?, हाच का तुमचा मराठी बाणा आणि काना?” म्हणालो,”नाही तसे काही नाही महाराज, तुमची जयंती आम्ही तुमच्यासाठी करतो महाराज आम्हाला तुम्हाला बघितले की वेगळा हुरूप येतो, तुमचे नाव घेतले तरी अंगातले रक्त सळसळते, एखाद्या शत्रूचा वार आम्ही हसत हसत निधड्या छातीवर झेलू इतकी ताकद तुमच्यामुळे आज आमच्यात आहे, आठवतो तुमचा इतिहास राजे आजही स्मरणात आहे तो इतिहास वाचला जरी तरी आम्हाला असे होते की आम्ही कधी हातात तलवार घेऊन लढण्यास सज्ज होऊ”.


रायबा म्हणाले,”तुमच्यात किती जरी ताकद असली तरी तुम्ही स्वराज्याच्या कामी येण्याच्या ताकदीचे नाहीत”. मी म्हणालो,”असं का म्हणतात रायबा, आम्ही देखील राजांचे मावळेच आहोत”. मी असे बोलल्यावर राजे आणखी चिडले आणि बोलले,”खबरदार स्वतःस स्वराज्याचा मावळा बनवून घ्याल तर”. “तुमच्यासारखे कुचकामी लोक स्वराज्यात कधीच नव्हते”. रायबा म्हणाले,”किंबहुना राजांनी असे लोक कधी स्वराज्याच्या कामी ठेवलेच नसते”. मी म्हणालो,”परंतु राजे तुम्ही रयतेचे राजे आहात जाणता राजा आहात, तुमच्यासारखा राजा दुसरा या पंचक्रोशीत पुन्हा होणे नाही. आम्हाला तुमची जाण आहे, आम्हाला आपल्या स्वराज्याची जाण आहे राजे”. राजे म्हणाले,”तुम्ही स्वराज्याची जाण आहे म्हणतात, स्वराज्यातील नियमांचे किती काटेकोरपणे पालन करतात, आम्ही सांगितलेल्या गोष्टी आजवर तुम्ही किती ऐकल्या, जिथे बघावे तिथे स्वराज्याच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात”. मी म्हणालो,”माफी असावी महाराज यापुढे असे होणार नाही”. राजे म्हणाले,”क्षमा असावी महाराज, माफी असावी महाराज असे केविलवाणे आर्जव अजून किती दिवस करणार आहात, सुधारणार कधी तुम्ही?” पुढे राजे म्हणाले,”या अशा पद्धतीने जर यापुढे शिवजयंती उत्सव करणार असाल तर शिवजयंती उत्सव साजरा नाही केला तरी चालेल, परंतु या प्रकारे साजरी केलेली शिवजयंती आम्हास मान्य नाही, आणि ते यापुढे खपवून ही घेतले जाणार नाही”. ” मी म्हणालो, “माफ करा महाराज, आमची चूक आम्हाला उमगली आहे”.
महाराज म्हणाले,”तुम्ही जयंतीच्या वेळेस दारू, सिगारेट, तसेच डीजे ढोल यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा आम्ही स्वराज्यात आणलेल्या किल्ल्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, तेथील कचरा साफ करून ज्या ज्या किल्ल्यांची पडझड झालेली आहे त्या किल्ल्यांची डागडुजी करण्याची मोहीम सुरू करा, मद्यपान, डीजे, ढोल या कुचकामी कार्यांत वापरण्यात येणारे पैसे किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी कामी लावा. तेथील येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन स्थळी स्वच्छता ठेवण्यास सांगा, तुम्ही ही तेथे स्वच्छता मोहीम सुरू करा. आणि जयंती ही साध्या पद्धतीने साजरी करा पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम, भारुड, गोंधळ असे कार्यक्रम घेण्यास कार्यकर्त्यांना उत्स्फूर्त करा, महाराष्ट्राचा मराठी वारसा जोपासत चला,तुमच्यात ही सर्वांच्यात एकी राहील, एकोपा राहील तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने शिवजन्मोत्सव साजरा होईल”. तेव्हा मी “जशी आपली आज्ञा महाराज” असे बोलून अचानक स्वप्नातून उठलो पण त्या नंतर मला अक्षरशः राजांच्या दरबारातून बाहेर पडल्यासारखे वाटले. राजांच्या दर्शनाने मी धन्य झालो.
तेव्हा मला ही असे वाटते महाराजांचा आपण मान राखून राजांनी सांगितल्याप्रमाणे केले, थोडक्यात त्यांची आज्ञा आपण पाळली तर नक्कीच ही शिवजयंती जगात भारी असेल आणि तीच महाराजांना खरी आदरांजली असेल.

लेखक : नयन धारणकर©®

प्रतिक्रिया व्यक्त करा