पाच संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी
सावंतवाडी
सुशांत खिल्लारे खून प्रकरणातील गुंता वाढतच चालला असून रविवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणी सांगली येथून आणखीन दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या. स्वानंद भारत पाटील (३१, रा. इस्लामपूर सांगली ) व राहूल बाळासाहेब पाटील (२८, रा. वाळवा सांगली) अशी त्या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या अटकेमूळे आता या खून प्रकरणात एकूण सात संशयित झाले आहेत. आपण प्लान करुनच त्याला मारले तसेच लाठ्या-काठ्या व कंबर पट्टयासह उसाच्या वाडांनीही मारहाण केल्याने त्यात सुशांत खिल्लारेचा मृत्यू झाला असल्याची कबूली त्यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाचही जणांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आता या प्रकरणाचा पुढील तपास कराड आणि पंढरपुरमध्ये करण्यात येणार असल्याची माहीती सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके यांनी दिली.
याबाबत डॉ. रोहिणी सोळंके यांनी म्हटले, मयत मुकादम सुशांत खिल्लारे खून प्रकरणात आणखीन काही जण असल्याचा आम्हाला संशय होता. त्यानुसार आम्ही सखोल चौकशी केली. यात अटकेत असलेल्या तुषार पवार याच्याकडे तपास केला असता त्या गुन्ह्यात आणखी काही जण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आम्ही पुढील तपासाला सुरुवात केली. यावेळी आणखी पाच नावे उघउ झाली. त्यामुळे या गुन्ह्यात मृत्यू झालेल्या खिल्लारे याला एकुण सात जणांनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यातील भाऊसो माने हा सुंशातचा मृतदेह आंबोली घाटात टाकत असताना तोल जाऊन दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. तर रविवारी यातील आबासो उर्फ अभय बाबासो पाटील (३५, रा. वाळवा सांगली), प्रविण विजय बळीवंत (२४, रा. वाळवा सांगली ) व राहूल कमलाकर माने (२३, रा. कराड सातारा) या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यांनतर अन्य दोघांची नावे उघड झाली. त्यानुसार त्या दोघांना रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.
सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्यासह उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलीस हवालदार सचिन कोयंडे, अमित राऊळ, काका कुडतरकर, गजानन देसाई, भूषण भोवर आदींचे पथक कराड येथे काल दाखल झाले होते त्यांनी रविवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
दरम्यान, या खून प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळवायचे आहेत. त्याचप्रमाणे संशयितांचा या खूनामागे आर्थिक व्यवहार वगळता आणखीन काही उद्देश होता का याबाबत अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानुसार त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.