You are currently viewing मडुरेत गव्यांकडून वायंगणी भातशेती फस्त

मडुरेत गव्यांकडून वायंगणी भातशेती फस्त

बांदा

मडुरा – परबवाडी येथील भुताचे टेंब परिसरातील वायंगणी भातशेतीसह रब्बी पिकांचे गव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले आहे. शेतकरी बाबली चिंतू परब व ज्ञानेश पांडुरंग परब यांच्या सुमारे एकरभर क्षेत्रातील वायंगणी शेती गव्यांनी फस्त केली. तसेच बाबली परब यांच्या मिरची रोपांचीही नासधूस केली. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा. नुकसानीचे पंचनामे करुन संबंधित शेतकर्‍यांना भरपाई देण्याची मागणी मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी केली.

गव्यांचा कळप शनिवारी रात्री मडुरा परबवाडी भागातील वायंगणी भातात घुसला. ज्ञानेश परब व बाबली परब यांची भातशेती खाऊन फस्त केली. उपसरपंच बाळू गावडे यांनी रविवारी नुकसानीची पाहणी केली. वनरक्षक आप्पासो राठोड यांच्याशी फोनवरुन संपर्क करुन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने मडुरा परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. मगरीही भातशेतीत फिरत असल्याने भाताची रोपे कुजून गेली आहेत. शासन वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे जाहीर करतात. वनविभाग मात्र शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात आग्रही दिसत नाही. शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी भरपाई पासून वंचित राहतात असा आरोप यावेळी बाळू गावडे यांनी केला.
प्रत्येक आठवड्यातून किमान एकवेळा ग्रामपंचायत कार्यालयात वनरक्षकाने हजेरी लावून शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी जिल्हा उपवन संरक्षक कार्यालयात तसे लेखी निवेदन दोन दिवसात सादर करणार असेही यावेळी बाळू गावडे शेतकर्‍यांना आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा