You are currently viewing आंबोली खून प्रकरणात कराड येथून अन्य तिघे ताब्यात

आंबोली खून प्रकरणात कराड येथून अन्य तिघे ताब्यात

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्यासह पथकाची कारवाई

गुन्हा दाखल : मारहाणीत सहभाग असल्याची कबूली

सावंतवाडी

वीट व्यवसायासाठी कामगार पुरवतो असे सांगून घेतलेले तीन लाख रुपये परत न केल्याच्या रागातून मारहाण करताना मृत्यू झालेल्या सुशांत खिल्लारे खून प्रकरणात सावंतवाडी पोलिसांनी कराड येथून अन्य तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या. अभय पाटील (३५), प्रवीण बळीवंत (२५) व राहूल माने (२३, सर्व रा. कराड) अशी या तिघांची नावे आहेत. शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्यासह सावंतवाडी पोलिसांचे पथक कराड येथे रवाना झाले होते. तेथून त्यांनी या तिघांना जेरबंद केले. मारहाणीत त्या तिघांचाही समावेश असल्याची कबूली त्यांनी दिली असून त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वीट व्यवसायासाठी कामगार पुरवितो असे सांगून सुशांत खिल्लारे याने मयत भाऊसो माने यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते. मात्र त्याने कामगारही पुरविले नाहीत तसेच घेतलेले पैसेही परत करत नसल्याने भाऊसो माने याने आपल्या सहकाऱ्यांसमवेत पंढरपूर येथे जात त्याला ताब्यात घेतले. त्याला घरात कोंडून ठेवून तसेच शेतात नेऊन आपल्या सहकाऱ्यांसमवेत मारहाणही केली. यात कमरेतील बेल्टच्या सहाय्याने जबर मारहाण करण्यात आल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. या मारहाणीत वापरण्यात आलेला सदरचा कंबरपट्टा ( बेल्ट ) सावंतवाडी पोलिसांनी जप्त केला होता तसेच याप्रकरणी ताब्यात असलेला संशयित तुषार पवार यांच्याकडे अधिक तपास सुरू होता.

या तपासात तुषार पवार याने दिलेल्या माहितीनुसार मयत भाऊसो माने याच्यासह सहकाऱ्यांनी आर्थिक देवघवीतून कामगार पुरवणारा मुकादम असलेल्या सुशांत खिल्लारे याचे पंढरपूर येथून अपहरण केले. त्यानंतर कराड येथिल एका निर्जन स्थळी आपण सर्व पार्टी करण्यासाठी बसलो. यावेळी त्याला सर्वानी मारहाण केली. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी भाऊसो माने याच्यासह आपण मिळून आणखी चौघे होतो, असे त्याने पोलीस चौकशीत सांगितले.

दरम्यान, संशयित तुषार पवार याने दिलेल्या माहीतीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उपनिरिक्षक सुरज पाटील, काका करंगुटकर, सचिन कोयंडे, अमित राउळ, गजानन देसाई, अभिजीत कांबळे आदींचे पथक शनिवारी कराड येथे जात त्यांनी अन्य तिघांना ताब्यात घेतले.

याबाबत डॉ. रोहीणी सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आम्ही संशयित पवार याची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर काही गोपनिय व्यक्तीकडुन मिळालेल्या माहीतीनुसार पुढील चौकशी करण्यात आली. यात काही सिसिटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. या सर्व चौकशीत या प्रकरणात या तिघांचा थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेवून चौकशी करता त्यांनी आपण हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील राहूल माने हा मयत भाऊसो माने याचा चुलत भाऊ आहे. सोमवारी या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा