मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम २५ लाख रुपये करण्यात आली आहे. याआधी ही रक्कम १० लाख रुपये इतकी होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम १० लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अँड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.