नेरूर येथे दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा
दशावतार कला ही कोकणची परंपरा आहे.लोकराजा सुधीर कलिंगण यांनी हि लोककला सातासमुद्रापार पोहोचविण्याचे काम केले. नाट्यकलेच्या सादरीकरणातून सुधीर कलिंगण यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून सोशल मीडियाच्या माध्यामतून आता हि लोककला अनेक देशात प्रसिद्ध झाली आहे. सुधीर कलिंगण यांच्या मृत्यूनंतर त्यांना लोकराजा हि पदवी देण्यात आली हा त्यांच्या केलेचा केलेला सन्मान आहे. सुधीर कलिंगण यांच्या रूपाने दशावताराला लोकराजा लाभला आहे. सुधीर कलिंगण यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी प्रेक्षकांच्या आशीर्वादाने सिद्धेश कलिंगण, पंकज कलिंगण यांनी भरून काढली.यापुढेही त्यांच्या पाठीशी जनतेने रहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण यांचा प्रथम स्मृतिदिन नेरूर येथे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी सुधीर कलिंगण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आ. वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी वेगवेगळ्या कलाप्रकारातून सुधीर कलिंगण यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. सुधीर कलिंगण यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा उलघडा करत त्यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.
यावेळी नेरूर माजी सरपंच शेखर गावडे, विद्यमान उपसरपंच दत्ता म्हादळकर, माजी उपसरपंच समद मुजावर, दत्ता देसाई, यशवंत तेंडोलकर, भास्कर सामंत, संतोष रेडकर, हवालदार शिंगाडे, सिद्धेश कलिंगण, पंकज कलिंगण, भागोजी गावडे, संदीप तोरस्कर, चंद्रकांत खोत, प्रवीण नेरुरकर आदींसह सुधीर कलिंगण प्रेमी व कुटुंबीय उपस्थित होते.