You are currently viewing जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनचा सम्राट

जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनचा सम्राट

*२२ ग्रँडस्लॅमसह नदालशी केली बरोबरी*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सर्बियाचा नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनचा सम्राट ठरला. जोकोविचने अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपनचे दहावे विजेतेपद पटकाविले. विक्रमी ३४ व्यांदा ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना खेळताना तो पुन्हा अजिंक्य ठरला. जोकोविच हा सर्वाधिक ग्रँडस्लॅम फायनल खेळणारा खेळाडू आहे. त्याने कारकीर्दीतील हे एकूण २२ वे ग्रँडस्लॅम जिंकून राफेल नदालशी बरोबरी केली.

तब्बल दोन तास ५६ मिनिटे चाललेल्या या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने धडाक्यात सुरुवात केली. पहिला सेट ६-३ असा जिंकला, तर दुसरा सेट सेट ७-६ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी अटीतटीची झुंज दिली; पण शेवटी जोकोविचने ७-६ ने सेट जिंकत विजेतेपद मिळविले. तिसऱ्या सेटमध्येही त्सित्सिपासने मुसंडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. या विजयासह जोकोविच एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा २४ वर्षीय त्सित्सिपास हा दुसरा सर्वात तरुण पुरुष खेळाडू ठरला. याआधी जोकोविचने २०११ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. जोकोविचने दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल खेळली; तर नऊ वेळा या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठत प्रत्येक वेळी विजेतेपद पटकाविले. जोकोविचने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये विजेतेपद पटकाविले होते. २०२२ मध्ये जोकोविच व्हिसाच्या कारणांमुळे ही स्पर्धा खेळू शकला नाही आणि राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले. मात्र आता त्याने २०२३ चे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविले.

*२२ ग्रँडस्लॅमसह नदालशी केली बरोबरी*

जोकोविचने याआधी नऊ ऑस्ट्रेलियन ओपन, दोन फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि तीन यूएस ओपनसह एकूण २१ ग्रँडस्लॅम जिंकले होते. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत फक्त राफेल नदाल जोकोविचच्या पुढे होता. नदालकडे २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. त्याचबरोबर रॉजर फेडरर २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने नदालशी बरोबरी करत २२ ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा