*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी सुभाष उमरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लिहावं मनाचं …..*
लिहावं मनाचं की
राहू द्यावं….
मनाच्या खोल गाभाऱ्यात
क्षणोक्षणी टोचणारे शब्द
पडून राहु द्यावे तसेच…..
आपण लिहलं मनातलं
आणि अर्थ काढावा दुसऱ्याने
तिसराच काही तरी…
म्हणून विचारतो
लिहावं मनाचं की राहू द्यावं…
साली आपलीच जिंदगी अशी
व्यक्त करायला शंभर विचार
आणि सांगायला एक नाही …
म्हणून आतल्या आत गुदमरतो
जीव बिनपाण्याच्या माश्यासारखा
तडफडत दिवसरात्र…
विचारांचा तमाशा मांडून
आपणच *निशब्द* व्हावं …
आणि
थांबवावे वादळ शब्दांचे
निजवावे शब्द …
आणि करावा प्रयत्न
त्यांना ठार मारण्याचा…
तरीही निर्माण होणार
तोच प्रश्न..
अन् मिळणारं उत्तर ही तेच
लिहावं मनाचं की राहू द्यावं…
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*