You are currently viewing वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या शैक्षणिक संकुलाचे भूमीपूजन

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या शैक्षणिक संकुलाचे भूमीपूजन

*वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या शैक्षणिक संकुलाचे भूमीपूजन*

*मुंबई परिसरातील बहुजनांच्या शैक्षणिक विकासात वसंतदादा पाटील प्रतिष्ठाचा मोलाचा सहभाग – प्रविण दरेकर*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणदानाचे कार्य करत असलेल्या शीव येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या शैक्षणिक संकुलाच्या वास्तूचे भूमिपूजन पर्यटनमंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी झालेल्या सोहळ्यास मुंबै बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रविण दरेकर, माजी पालिका आयुक्त विजयसिंह पाटणकर, माजी सनदी अधिकारी डॉ. ए. टी. कुंभार, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई, पालिका कार्यकारी अभियंता डी. बी. पाटील, वास्तुविशारद सर्वश्री बी. के. म्हात्रे, पी. एम. गजरेलवाल व बिल्डिंग डिझायनिंग तज्ञ शांतीभाई जैन, माजी नगरसेवक बळवंत पवार, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आनंद पोतदार, आर्किटेक्ट भुवन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील बहुजन कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानने जाणीवपूर्वक कार्य केले आहे, त्याचबरोबर संस्थेच्या आव्हानात्मक कार्यकाळात सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी केलेल्या अविरत कार्यामुळे संस्था उभी राहिली आहे. त्याबद्दल आमदार प्रविण दरेकर यांनी प्रशंसोद्गार काढले तसेच वसंतदादा पाटील हे नाव असल्यामुळे संस्थेला सदैव सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

पर्यटन मत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी या प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या तसेच यापुढील काळात संस्थेचा शैक्षणिक क्षेत्रातील लौकिक अधिकाधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

संस्थेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ स्वीकारल्यानंतर वर्षभरातच अनेक समस्या तसेच आव्हानांचा सामना करावा लागला परंतु संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे या सर्व समस्या सोडविण्यात यश आले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आपला संघर्षाचा भूतकाळ दिसत असल्यामुळे संस्थेच्या विकासासाठी झटण्याची भावना आपोआपच मनात येत असल्याचे भावनावश होत अध्यक्ष नंदकुमार काटकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाकडे मुंबई व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे, त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. यापुढील काळात आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता ठेवत हे शिक्षणदानाचे व्रत कायम राहिल, असा ठाम विश्वास सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केला.

हे नवे शैक्षणिक संकुल २ लाख चौरस फूट जागेवर उभे राहणार असून त्यात सहा मजले असतील. इंटरनॅशनल स्कूल, इंटरनॅशनल लेव्हल रिसर्च सेंटर, फॉर्मसी, आर्किटेक्ट, विधी या विषयावरील महाविद्यालयांसाठी स्वतंत्रपणे जागा प्रत्येक मजल्यावर दिल्या जातील. त्याचबरोबर विद्यार्थी व शिक्षकांसाठी रिक्रिएशन एरियादेखील उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या २११ कर्मचारी व २१०८ इतकी विद्यार्थी संख्या असलेल्या संकुलात या नव्या संकुलाच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावर वाढ होईल तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा सर्वांसाठीच केंद्रस्थानी असलेल्या या संकुलामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांसाठी इथे शिक्षण घेणे अत्यंत सोयीचे ठरेल, असा विश्वास अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा