दोन दुकाने जळून खाक: लाखोंनी रुपयांचे नुकसान
मालवण
संपूर्ण मालवण शहर भल्या पहाटे साखरझोपेत असतानाच शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड येथे आगीने तांडव नृत्य करीत रौद्ररूप धारण केल्याने यात दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून या दोन दुकानाच्या बाजूला असलेल्या एका दुकानाला आगीच्या जळा बसल्याने किरकोळ हानी झाली आहे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या काही नागरिकांच्या दृष्टिक्षेपास ही घटना पडल्यानंतर अग्निशामक बंबला पाचारण केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला या आगीत दोन दुकानातील कपडे, शिलाई मशीन आणि अन्य साहित्य भक्ष्यस्थानी पडल्याने १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असावी अशी चर्चा होती
मालवण धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड नजीक विलास परुळेकर यांच्या मालकीची दोन दुकाने आहेत. या मधील विलास ट्रेडर्स या दुकानात गेली २२-२३ वर्षे शिलाई मशीन विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करतात. तर बाजूचे दुकान त्यांनी मृणाल मोंडकर यांना भाड्याने दिले असून त्या दुकानात श्रीमती मोंडकर या लेडीज टेलरिंग व शिवणक्लासचा व्यवसाय करतात या दुकानांच्या बाजूलाच फ्रेंड्स जेंटस पार्लर व इतर दुकाने आहेत काल नेहमी प्रमाणे दुकाने बंद करून सर्वजण घरी गेले होते
आज पहाटे काही नागरिक मॉर्निंग वॉकला जात असताना परुळेकर आणि मोंडकर यांच्या दुकानांना आगीने घेरल्याचे निदर्शनास आले त्या नागरिकांनी तात्काळ स्थानिकांच्या निर्दशनास आणल्यानंतर मालवण नगरपालिकेच्या अग्निशमाक बंबास बोलाविण्यात आले अग्निशमाक बंबाने क्षणाचाही विलंब न लावता आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आग एव्हढी भडकली होती की आगीच्या ज्वाला उंचच उंच भडकल्या होत्या काही कालावधीतच ही आग शमविण्यात अग्निशमन बंबाला यश आले
या आगीत विलास परुळेकर यांच्या मालकीची दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून या आगीत विलास ट्रेडर्स मधील विक्रीच्या पाच नवीन शिलाई मशिनसह १८ शिलाई मशिन ,तसेच फर्निचर जळाले आहेत तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळाले. यातील मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. तर बाजूच्या फ्रेंड्स जेंटस पार्लर या दुकानात आगीने शिरकाव करण्यापूर्वीच आग शमविण्यात यश आले असले तरी आगीच्या जळामुळे या दुकानाचे किरकोळ नुकसान झाले आहे
ही घटना स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला आणून आग विझवण्यात आली आग विझवण्यासाठी नितीन धुरी, संतोष धुरी माजी नगरसेवक मंदार केणी, राजू बिड्ये, महेश सारंग, दिलीप हडकर, विलास परुळेकर, चारुशीला आढाव, विजय चव्हाण, दादा वाघ, अरुण धुरी, भाई कासवकर यांच्यासह अन्य नागरिकांनी प्रयत्न केले. नायब तहसीलदार कोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.