यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधांची कमी पडता नये – पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सक्त सूचना
मालवण / मसुरे :
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यंदा हा आकडा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधांची कमी पडता नये, अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे आयोजित बैठकीत अधिकारी वर्गाला दिल्या. आंगणे कुटुंबीय मंडळ यांच्या मागणीनुसार प्रशासनाने नियोजन पूर्ण करणे आवश्यक आहे. ही जत्रा आपली आहे. याच भावनेतून प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी काम करावे. कामात कोणत्याही त्रुटी राहणार नाही. प्रत्येक काम दर्जेदार व वेळेत पूर्ण झाले पाहिजे. अश्या पद्धतीने काम करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
आज गुरुवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भराडी देवीचे दर्शन घेत यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. मालवण तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले.
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सव ४ व ५ फेब्रुवारी रोजी होत आहे. यात्रा नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज गुरुवारी आंगणेवाडी येथे भेट देत आढावा घेतला. रस्ते व अन्य कामांबाबत काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, आंगणेवाडी विकास मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, मंडळ पदाधिकारी बाळा आंगणे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, युवमोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रभाकर सावंत, महेश बागवे, महेश मांजरेकर, हरीश गावकर, विक्रांत नाईक यासह पोलीस, महसूल, बांधकाम, आरोग्य, वीज व अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आढावा बैठक प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता अजित पाटील, शाखा अभियंता प्रदीप पाटील, मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, गणेश गोवेकर, दिनेश आंगणे, स्वप्नील धामापूरकर, नंदू आंगणे, समीर आंगणे प्रसाद मंगेश आंगणे, गणेश आंगणे, तसेच आंगणे कुटुंबीय उपस्थित होते.
आंगणेवाडी मध्ये मोबाईल रेंज बीएसएनएलची असून येणाऱ्या भाविकांना एकमेकांशी संपर्क साधणे अधिक सोपे जावे याच्यासाठी जिओचा हंगामी टॉवर आंगणेवाडी मध्ये यात्रोत्सवापूर्वी उभारण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी पाच किलोमीटरवर मोबाईल टॉवर व्हॅन उभ्या केल्या जाणार आहेत.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी आंगणेवाडी येथे भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. जत्रोत्सवापूर्वी आंगणेवाडी मध्ये टँकरद्वारे जास्तीचा पाणीपुरवठा नियमित केला जाईल आणि त्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले. बाळा आंगणे यांनी हंगामी एसटी स्टॅन्ड परिसरात रात्रीच्यावेळी खिसे कापू पासून भाविकांना त्रास होतो त्याबाबत पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याचे मागणी केली. मागणीनुसार स्टॅन्ड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस विभागामार्फत लावण्याचे सांगण्यात आले. तसेच मंदिर परिसरामधील लाईट व्यवस्थेचा प्रश्न वीज वितरण कंपनीच्या वतीने दूर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.
आंगणेवाडी येथे मसूरेकडील बाजूने बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडचा वापर संध्याकाळी सात नंतर होत नसल्यामुळे व्हीआयपी रस्त्याने येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था सायंकाळ नंतर हेलिपॅड वर केल्यास बऱ्याच प्रमाणात दत्तघाटी येथील वाहतुकीवर येणारा ताण कमी होणार आहे असे महेश बागवे यांनी सांगितले. याबाबत कार्यवाहीचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले.