प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दिग्गज राजकीय नेते एकाच व्यासपीठावर येण्याची चर्चा आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे तीन पक्षांचे तीन शिलेदार एकाच मंचावर दिसणार आहेत. महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ हे दोन ब्रँड असल्याचा उल्लेख करत काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भविष्याबद्दल काळजी व्यक्त केली होती.
अंबरिश मिश्र लिखित ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. यावेळी शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राज ठाकरे आणि संजय राऊत यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
सध्याच्या काळातील कदाचित राज ठाकरे, शरद पवार, आणि संजय राऊत यांचे जाहीर मंचावर एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असावी. उत्तम वक्ते असलेले हे तिघेही जण कोणती टोलेबाजी करणार, यावेळी तिघांमध्ये कोणत्या गप्पा रंगणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.