You are currently viewing बांदा-नेतर्डे रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा जनआंदोलन

बांदा-नेतर्डे रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा जनआंदोलन

बांदा

जोखीम कालावधी संपण्यापूर्वीच दुरावस्था झालेल्या बांदा-नेतर्डे रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा लेखी इशारा उपसरपंच जावेद खतीब यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास कार्यालयच्या वतीने आज रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वतः उपसरपंच खतीब, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर यांनी उपस्थित राहत ठेकेदाराला सूचना दिल्यात.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकासच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली होती. येत्या १५ दिवसात खड्डे न बुजविल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा उपसरपंच जावेद खतीब यांनी अभियंता यांना दिला होता.
निवेदनात म्हटले होते की, बांदा ते आरोसबाग गोवा सीमेपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीतच रस्ता वाहतुकीस खराब झाला आहे. गतवर्षी मागणी केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली होती. रस्त्याच्या जोखीम कालावधीची मुदत ही २ महिन्यात संपणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी स्वीकारून तात्काळ कार्यवाही व्हावी.
कनिष्ठ अभियंता राजाराम धर्णे यांनी तात्काळ दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज प्रत्यक्ष कामास सुरुवात देखील करण्यात आली. यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर, शुभम साळगावकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ठेकेदाराला खड्डे बुजविण्यासाठी सूचना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा