*३० व ३१ जानेवारीला अर्ध्या मुंबईत पाणी बंद*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात चार हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम ३० जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून काम हाती घेतले असून, ३१ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत काम पूर्ण होणार आहे. या कालावधीत पालिकेच्या वॉर्डापैकी १२ वॉर्डातील पाणीपुरवठा बंद राहणार असून, काही भागांत २५ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाचे प्रमुख जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. दुरुस्तीच्या कालावधीत पाणी जपून वापरा, असे आवाहन जल विभागाने केले आहे.
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती जाणार आहेत. या कामामुळे पश्चिम उपनगरातील के पूर्व के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे, तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागांत देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.
तसेच ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या २ विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे, तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.