You are currently viewing मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा – श्रीकांत देशपांडे

मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा – श्रीकांत देशपांडे

*मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा – श्रीकांत देशपांडे*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त श्री. देशपांडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्रालय पत्रकार कक्ष येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव मनोहर पारकर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, श्री. साखरे उपस्थित होते.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मिलिंद बोकील, अभिनेता गौरव मोरे, निवडणूक दूत सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. ही लोकशाही दिंडी राष्ट्रीय मतदार दिनी सकाळी ९ वा. एनसीपीए येथून पाटकर सभागृहापर्यंत निघणार आहे. तसेच भारतीय निवडणूकांच्या इतिहासावर आधारित चित्रमय प्रदर्शन, दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आयोगाची निर्मिती असलेल्या ‘मै भारत हूँ’ या निवडणुकांवर आधारित गाण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या गाण्याचे दिग्दर्शन व लेखन सुभाष घई यांनी केले असल्याची माहितीही श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात मतदार नोंदणी आणि मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव – माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय रांगोळी आणि भित्तिपत्रक या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरणही होईल.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असेही श्री. देशपांडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा