You are currently viewing पंतप्रधान मोदींनी केलेले हस्तांदोलन आणि साधलेला संवाद म्हणजे मोदींना बुद्धिजीवी नेत्यांची पारख

पंतप्रधान मोदींनी केलेले हस्तांदोलन आणि साधलेला संवाद म्हणजे मोदींना बुद्धिजीवी नेत्यांची पारख

मुंबईतील सभेच्या दरम्यान पंतप्रधान मोदींचे नाम. दीपक केसरकरांशी हस्तांदोलन आणि संवाद

संपादकीय….

महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले सावंतवाडीचे लोकप्रिय नेते नामदार दीपकभाई केसरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसं पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात आमदार झाल्यानंतर सर्वांच्या मुखात असलेले नाव म्हणजे दीपक केसरकर…! महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असे नारायण राणे यांना मैदानात उतरून संघर्ष करणारे आणि राजकीय प्रवासात चार पावले मागे जायला लावणारे असे जर नेते कोण असतील तर ते म्हणजे दीपक केसरकर आणि “राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो” असेही उदाहरण जर पहायचे असेल तर ते म्हणजे अलीकडेच “नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी मी त्यांचा प्रचार करणार” असे म्हणणारे एकेकाळीचे नारायण राणे यांचे कट्टर विरोधक दीपक केसरकर…!
प्रचंड महत्त्वाकांक्षा घेऊन राजकीय प्रवासाला निघालेल्या नाम.दीपक केसरकर यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, पदापासून आमदार, मंत्री अशी विविध पदे भूषवली आणि आपल्या स्वप्नांना गवसणी घातलेली आहे. कुणी स्वार्थी म्हणेल किंवा महत्त्वाकांक्षी परंतु राजकारण म्हटल्यानंतर प्रत्येक जण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि असाच प्रयत्न सावंतवाडीचे नेते नाम.दीपक केसरकर यांनी केल्याचे त्यांच्या राजकीय कारकीर्दीवरून दिसून येते. काल मुंबई येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडला. बांद्रा येथील बीकेसी मैदानावर झालेल्या सभेच्या दरम्यान सर्वांना आश्चर्य वाटेल असा एक प्रसंग घडला तो म्हणजे सभा आटोपून व्यासपीठावरून निघत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित असतानाच नाम. दीपक केसरकर यांच्याशी हस्तांदोलन करत काही क्षण संवाद देखील साधला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुद्धिजीवी लोकांची पारख असल्याचे दिसून आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारख्या बुद्धिजीवी खासदारांचा वारसा लाभलेला आहे आणि आता त्याच सिंधुदुर्ग मधून नाम.दीपक केसरकर हे नरेंद्र मोदी यांच्या नजरेत आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात नामदार दीपक केसरकर हे केंद्रात खासदार म्हणून गेले तरी आश्चर्य वाटू नये.
शरद पवार यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रवेश करण्यापूर्वी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री कै.मनोहर पर्रीकर यांच्यासोबत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी दीपक केसरकर भाजपमध्ये जाणार हे अटळ होते, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाची ताकद नगण्य असल्याने दीपक केसरकर यांनी मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत दुसऱ्यांदा भेट झाल्यावर पंतप्रधानांनी दीपक केसरकर यांच्याशी हस्तांदोलन करून संवाद साधल्यानंतर नाम.दीपक केसरकर यांची पहिली भेट देखील पुन्हा एकदा चर्चेत आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा