शंकर पार्सेकर , मंजुषा परब यांची माहिती
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावात घरोघरी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मार्गदर्शन शिबिरांची आवश्यकता आहे त्यासाठीच खादी आणि ग्रामोद्योग आयोग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार तसेच गजानन नाईक बहुउद्देशीय केंद्र,डहाणू व व्यावसायिक प्रशिक्षण सहयोगी संस्था लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडेरेशन यांच्यावतीने स्वयंरोजगार जागरूकता व प्रशिक्षण शिबिर २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता शिरवल ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तरुणांनी सहभागी व्हावे.असे आवाहन उद्योजक शंकर पार्सेकर व लक्षपूर्ती वेल्फेअर फेडरेशनच्या अध्यक्षा मंजुषा परब यांनी केले आहे.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी लक्षपूर्ती वेल्फेअर फेडरेशनच्या उपाध्यक्ष संगीता कदम, विश्वस्त मनीषा भोयर उपस्थित होत्या.
यावेळी मंजुषा परब म्हणाल्या, या स्वयंरोजगार मार्गदर्शन, प्रशिक्षण व जागरूकता शिबिराचे आयोजन उद्योजक शंकर पार्सेकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.या शिबिरात स्वयंरोजगाराबद्दल माहिती देण्यात येणार आहे. उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख आणि सेवा क्षेत्रासाठी २० लाखांपर्यंत कर्ज सुविधा असून कर्ज सुविधांवर ३५टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते. १८ वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती , सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत सहकारी संस्था, एनजीओ स्वयंरोजगारासाठी पात्र आहेत. याबाबतची अधिक माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांचा पुरुष व महिलांचे बचत गट, ग्रामीण भागातील तरुण यांना लाभ होण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम आमची संस्था घेत असते. त्यामुळे अशा प्रकारचे जागरूकता उपक्रम मार्गदर्शन शिबिरे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना आयोजित करायची असतील तर संबधित सरपंचानी संस्थेशी संपर्क साधावा. शासन तसेच जनतेतील दुवा म्हणून आमची संस्था ग्रामपंचायतीला सहकार्य करेल.असे मंजुषा परब म्हणाल्या.
शंकर पार्सेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावात घरोघरी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शन शिबिरांची आवश्यकता आहे. मात्र, अनेक अधिकाऱ्यांची तशी मानसिकता दिसत नाही. त्यामुळे त्यांचे हवे तसे सहकार्य अनेकवेळा मिळत नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशा प्रकारचे उपक्रम सिंधुदुर्गात राबविले जावेत.यासाठी अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.अशी आमची विनंती आहे. असेही शंकर पार्सेकर यावेळी म्हणाले.
तसेच शिरवल येथील शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी, महिला बचत गटातील महिलांनी सहभागी व्हावे. असे आवाहनही आयोजक शंकर पार्सेकर यांनी यावेळी केले.