रत्नागिरी जिल्ह्यात भेसळयुक्त ओले काजुगर विक्री
राजापूरातील काजू शेतकरी विक्रांत देसाई यांनी डुप्लीकेट काजुगर विक्रीचा केला पर्दाफाश
रत्नागिरी जिल्ह्यात भेसळयुक्त ओले काजुगर विक्री होत असल्याची बाब उघड झाली आहे. राजापूरातील काजू शेतकरी विक्रांत देसाई यांनी डुप्लीकेट काजुगर विक्रीचा पर्दाफाश केला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही व्यावसायिक सुखे ड्रायफ्रूट म्हणून संबोधले जाणारे काजूगर पाण्यात भिजवून ओले नॅचरल काजूगर म्हणून विक्री केली जात आहे. हे काजू रत्नागिरी आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे.
विक्रांत देसाई हे राजापूरातील प्रथितयश काजू बागायतदार आहेत. ते काजुच्या झाडावरचे ओले काजूगर काढून त्याची विक्री करतात. ओल्या काजुगरांना खूप मागणी असते. त्याला किंमतही चांगली मिळते. ओले काजूगर सध्या बाजारात 1600 रु. ते 2000 रु. या दराने विक्री केले जात आहेत. मात्र सुखे काजू पाण्यात भिजवून काजुगर तयार केले जातात त्याचे दर सध्या बाजारात 1300 रु. ते 1500 रु. पर्यंत विक्री केली जात आहे. हे काजुगर जरी स्वस्त असले तरी देखील ते झाडावरचे चांगल्या दर्जाचे काजूगर नाहित. हा अशा पद्धतीने काजू भिजवून विकल्यामुळे ओल्या काजूची असणारी आतुरता आणि कुतूहल येणाऱ्या काही वर्षात नष्ट होईल याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. सदरच्या डुप्लीकेट काजू विक्री ही सिंधुदूर्ग जिल्ह्यातून होत असल्याची माहीती विक्रांत देसाई यांनी दिली आहे.
*विक्रांत देसाई यांची प्रतिक्रीया*
ओले काजूगर गरम पाण्याशिवाय सोलता येत नाहित. डुप्लीकेट काजूगर कसेही सोलता येतात. मुंबई मध्ये जी ओल्या काजुगराची विक्री होतेय ती प्लास्टिक पिशवीतून होते. ओला काजुगर प्लास्टिक पिशवीतून विकल्यास त्याला बुरशी येते. ओला काजुगर कागदी बॉक्स मधून विकायचा असतो किंवा कापडी पिशवीतून विकावा लागतो. ब-याच वेळा ते सोलूनच विकले जात आहेत. ओल्या काजूगराची उसळ खायला चांगली लागते. परंतू ओले काजूगर खरेदी करताना त्याच्या गुणवत्तेची खात्री करुनच घ्यावी असे आवाहन मी यामध्यमातून करतो. यासंदर्भात अधिक माहीती करिता +91 8888575555 या क्रमांकावर संपर्क साधावा.
*मंदार सप्रे यांची प्रतिक्रीया*
मी देखील राजापूर तालुक्यातील ओणी पूर्व भागातील एक शेतकरी आहे. विक्रांत देसाई हे माझे मित्र असून त्यांनी ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली. ओल्या काजुगरांच्या अशा प्रकारच्या विक्रिबाबत आणि ग्राहकांची होत असलेल्या फसवणुकीच्या या प्रकाराबाबत मी आमदार शेखर निकम यांच्याकडे कैफियत मांडली. आमदार शेखर यांनी तात्काळ सदर बाब गांभीर्याने घेऊन ती विधासनभेत प्रकर्शाने मांडली जाईल आणि ग्राहकांना न्याय मिळवून दिला जाईल असे सांगितले आहे.