रस्त्याचे कार्पेट न केल्यास २६ जानेवारीला आंदोलन ; बांधकामच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर…
मालवण
मालवण- कसाल राज्यमार्गावरील जरीमरी घाटी रस्त्याचे कार्पेटीकरण न झाल्यास युवासेना शिवसेना कुंभारमाठच्या वतीने २६ जानेवारीला रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना उपविभाग प्रमुख राहुल परब यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर केले.
मालवण- कसाल राज्यमार्गावरील जरीमरी घाटी येथील मुख्य रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे अपघात होत असल्याने युवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर संबंधित ठेकेदाराला रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना बांधकाम विभागच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार मागील महिन्यात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र हे काम व्यवस्थित न केल्याने वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना कसरत करतच जावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांची होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी या रस्त्याचे तत्काळ कार्पेटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात यावे. याची कार्यवाही न झाल्यास युवासेनेच्या वतीने २६ जानेवारीला रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्री. परब यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता यांना आज सादर करण्यात आले. यावेळी युवासेना शाखाप्रमुख स्वामीदास शिरोडकर, संजय देऊलकर महिला पदाधिकारी शितल देऊलकर, मुक्ता राजपुत आदी उपस्थित होते.