सावंतवाडी
शहरातील माठेवाड्यात पाच एकर, तर भटवाडी परिसरात बारा एकर अशी जागा केवळ हाॅस्पिटलसाठी प्रस्तावित आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात वेळ न घालवता या जागेचा “सिव्हील” हॉस्पिटलसाठी विचार करण्यात यावा, अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत.
सावंतवाडी पालिका व शासनाकडून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने शहरात दोन ठिकाणी जागा राखीव ठेवल्या आहेत. त्यात माठेवाडा येथे पाच एकर तर भटवाडी येथे बारा एकर जागेचा समावेश आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात न अडकता आणि जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेता या राखीव जागेत “सिव्हील” हॉस्पिटल नव्याने उभारावे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून लवकरात लवकर कार्यवाही सुरू करावी. जेणेकरून येथील जनतेला भेडसावणारी आरोग्याची समस्या दूर होईल. तसेच येथील रुग्णांना गोवा, बेळगाव, कोल्हापूर आदी ठिकाणी उपचारासाठी जाऊन होणारा अवाढव्य खर्च टाळता येईल.