आमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख नाही..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता प्रसाद ओक करणार.
मुंबई :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तैलचित्राचं अनावरण 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता विधानभवनात होणार आहे. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिका नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पत्रिकेत उध्दव ठाकरे आणि कुटुंबाच्या नावाचा समावेश नाही. मात्र बाळासाहेबांच्या तैलचित्र सोहळ्याबाबत ठाकरेंना वेगळी निमंत्रण पत्रिका पाठवणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलयं. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिनेता प्रसाद ओक करणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा अंतिम टप्यात आहे. प्रोटोकॉलनुसार या पत्रिकेत शासकीय पदाधिकऱ्य़ांची नावे असतात असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरणाचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला होता. त्या निर्णयानुसार मुंबईतील विधानभवनात तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज दिली.
महाराष्ट्र विधानमंडळाकडून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख प्रोटोकॉल प्रमाणं टाळण्यात आला आहे.