You are currently viewing मकर संक्रांतीच्या मध्यरात्री न्हावेली, देऊळवाडी येथे गवताच्या गंजीला आग; माथेफिरूचे गंभीर कृत्य

मकर संक्रांतीच्या मध्यरात्री न्हावेली, देऊळवाडी येथे गवताच्या गंजीला आग; माथेफिरूचे गंभीर कृत्य

पोलीस चौकशीकडे गावातील लोकांचे लक्ष

सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात देऊळवाडी येथे श्री. नारायण विठ्ठल नाईक (वय 55) हे आपली पत्नी सौ.लक्ष्मी व मुलगा देवेंद्र यांच्यासह राहतात. श्री.नारायण नाईक हे सर्वसामान्य शेतकरी असून भात कापणी झाल्यानंतर आपल्या घरासमोरील स्वतःच्या जागेत गुरांसाठी लागणाऱ्या गवताची गंजी त्यांनी उभी केली होती. दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी रात्रौ 11.00 वाजता नाईक कुटुंबीय झोपी गेले असता 11 वाजून 45 मिनिटाचे दरम्यान त्यांच्या घरासमोरील रचून ठेवलेल्या गवताच्या गंजीला आग लागल्याचे त्यांचा मुलगा देवेंद्र नाईक यांच्या निदर्शनास आले.
आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर देवेंद्र यांनी आई-वडिलांना उठवून गवताच्या गंजीला आग लागल्या मुळे आरडाओरडा केला. यावेळी शेजारचे लोक जमा झाले परंतु तोपर्यंत गवताची गंजी पूर्णपणे जळून खाक झाली होती. श्री नारायण नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदरची आग लागल्यामुळे गवताच्या गंजीचे सुमारे 15 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. आग लागण्याचा हा प्रकार का व कसा घडला? याची योग्य ती चौकशी पोलीस यंत्रणेने करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे.
सदरची रचून ठेवलेली गवताची गंजी ही नारायण नाईक यांच्या घरापासून काहीच अंतरावर होती. आग लागण्यासारखी कोणतीही परिस्थिती बाजूला नसताना अचानक गवताच्या गंजीला कशी काय आग लागली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे गवताच्या गंजीला लागलेली आग ही अज्ञात माथेफिरूकडून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. गवताच्या गंजीला लागलेली आग ही घटना गांभीर्याची नसेलही, या घटनेमध्ये जीवितहानी देखील झाली नसेल परंतु गवताच्या गंजी पासून काहीच अंतरावर असलेले घराणे जर पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडू शकला असता. न्हावेली गावात घडलेल्या घटनेची चौकशी पोलीस यंत्रणेकडून कशाप्रकारे होते याकडे न्हावेली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये आणि गोरगरीब शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य ती चौकशी करून अज्ञात माथेफिरूवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा