You are currently viewing मी तिळगुळ संक्रात…एक संवाद

मी तिळगुळ संक्रात…एक संवाद

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांनी तिळगुळाशी साधलेला संवाद*

*मी तिळगुळ संक्रात…एक संवाद*

*मी*..अगबाई! नवं वर्षंउगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले. .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू,आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी संस्काराची मूळं नाही सुटत हो..
पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..
काय म्हणताय् तिळगुळजी..
*तिळगुळ*…सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजुन तीळगुळ घरी बनवतेस…
*संक्रात*..अरे पण तुझं महत्व सांग ना..
*तिळगुळ*…हे बघ तिळआणि गुळाचं बंधन
म्हणजे मी..तिळगुळ.हेमंत ऋतुत येते संक्रांत..
थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक ,स्निग्ध.शिवाय त्यातली अॅमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज आणि लोहअसते .ते .शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का?शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक.राग हेवे दावे विसरून जायचे.नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..
*मी*..किती छान!!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..
*संक्रांत*…अगदी बरोबर!
*मी*..पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट कां बरं बोलतात!!
*संक्रांत*…कारण यावेळी एका राशीतून दुसर्‍या
राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात.याचवेळी
उत्तरायण सुरु होते.हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला
जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं..
सूर्याची पूजा केली जाते.शुक्राचाही उदय होतो..
*मी* ..भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..
*संक्रांत*..हो .तामीळनाडुत पोंगल असतो.बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…
*मी* ..खिचडी?
*संक्रांत*…हो.कारण या दिवशी तुर मसुर तांदुळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे.
तीळाचे लाडु ,वड्या ,रेवडी गजक गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…
*मी*..वा!!किती छान माहिती मिळाली.भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे,
त्यामागे शास्त्रीय विचार आहे.बदलणार्‍या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानीक अभ्यास आहे…मग स्त्रीयांसाठी हळदीकुंकु,वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण पतंग उडवणे
या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्‍या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.
खरोखरच आज मला मी,तीळगुळ आणि संक्रांत यातील परस्पर संबंध डोळसपणे जाणता आले…
चला तर मग
*तिळगुळ घ्या अन् गोड बोला….*.

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा