सावंतवाडी
शहरात पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी वनवे मार्ग सुरू करण्या संदर्भात तसेच पार्किंग नियोजना संदर्भात नागरीक, पालिका प्रशासन यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच रिक्षा, कार चालक तसेच व्यापार्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे आवाहन सावंतवाडीचे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी आज येथे केले. दरम्यान वाहन चालकांनी वाहने चालवताना स्वतःसह प्रवाशी तसेच ग्राहकाची काळजी घेणे गरजेचे आहे, असे सांगत वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, असेही आवाहन त्यांनी केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहा अंतर्गत सावंतवाडीत आज रिक्षा, टेम्पो, सिटर तसेच कार चालक व वाहकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर शहरात रॅली काढुन अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांनी सतर्कता बाळगावी, असा संदेश देण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन पोलिस निरिक्षक मेंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. मेंगडे म्हणाले, सावंतवाडी शहरात पार्किंगची समस्या मोठी आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने गाड्या लावल्या जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. तसेच वन-वे सुरू करण्यात यावा, अशी नागरीकांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच सावंतवाडीतील पत्रकारांशी चर्चा करण्यात आली आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व वाहनधारकांकडुन सहकार्य होणे अपेक्षीत आहे, असे ते म्हणाले. यावेळी वाहतूक पोलिस राजा राणे, सुनिल नाईक आदींनी उपस्थित वाहनधारकांचे आभार मानले. यावेळी रिक्षा, सिटर, टेम्पो चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.