भारतीय महान संस्कृतीचे दीपस्तंभ म्हणजे स्वामी विवेकानंद होय – प्रा.अरुण मर्गज
कुडाळ :
“जगभरामध्ये आजही ज्या संस्कृतीकडे आदरणीय पाहिले जाते अशा भारतीय महान संस्कृतीचे पूजक प्रसारक व दीपस्तंभ म्हणून स्वामी विवेकानंदांचे कार्य कर्तृत्व अलौकिक आहे. त्यांच्या विचारांतील मानवतावाद आजही जगभरामध्ये आदर्शवत मानला जातो. आणि अशी महान विभूती भारतीय आहे. ही आपणांस अभिमानास्पद गोष्ट आहे.”असे उद्गार प्रा अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रमातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये स्वामी विवेकानंदाचे धर्मविषयक विचार हे जगभरामध्ये आदर्शवत मानले जातात आणि या संदर्भातल्या विचार विविध आठवणी उपस्थितांसमोर कथन केल्या .”माणसातील सर्व उत्तमाचा विकास म्हणजे शिक्षण अशी शिक्षणा संदर्भातली त्यांची उच्च धारणा आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अंगीकारण्याच्या गरजेचे प्रतिपादन करत त्यांच्या संदर्भातल्या विविध आठवणी आणि त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक विचार उपस्थितांसमोर कथन केले. त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यामध्ये जिजाऊंचे असलेले योगदान याची उपस्थितांना आठवण करून दिली.
यावेळी व्यासपीठावर बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, उपप्राचार्य विभा वझे नर्सिंग महाविद्यालयाच्या ,प्रा.गौतमी माईणकर,कृतिका यादव, ज्युनियर कॉलेजचे मंदार जोशी व विविध विभागांचे विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांतर्फे रूपाली सांगेलकर यांनीही स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला
जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या कार्यक्रमांमध्ये बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.