*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझे कोकण*
—————————————-
माझे कोकण कोकण
काय सांगू त्याचा थाट
दऱ्या, डोंगर हिरवे
आणि निळेशार काठ ll १ll
गड, किल्ले, रस्ते, वाटा
लाल सुगंधाचा साज
नित्य कष्टाची वाजते
मनी समुद्राची गाज ll२ll
आंबे, फणस, जांभूळ,
ताड, माड, रानमेवा
राबणाऱ्या हातांसाठी
कष्ट हाच असे ठेवा ll३ll
उन्हे झेलीत कपारी
उभी गर्भार बाभळी
दुःख सोसुनिया देते
फळे गोंडस पिवळी ll ४ll
बोरे, तोरणे, जांभळे
करवंदे काळी..काळी
काटेकुटे शिकविती
जीवनाची दाट जाळी ll५ll
असे स्वभाव इथला
फणसाच्या काट्यावाणी
नित्य वसते हृदयी
थंड शहाळ्याचे पाणी ll६ll
नार नेसे नऊवारी
हौस नथ – बुगड्यांची
गणेशाच्या चतुर्थीला
रीत झिम्मा – फुगड्यांची ll ७ll
किती येवोत वादळे
जगण्याची भारी आस
मोठ्या मनाची माणसे
नाही कर्ज आणि फास ll८ll
आहे आनंद मजला
माझे देवगड गाव
जगामध्ये मिरविते
आंबा हापुसाचे नाव ll ९ll
सौ.संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.
७७१०८३२२३०.