मालवण / मसुरे :
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2015-16 पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात.
सन 2022- 23 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या कला उत्सव स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वीस विद्यार्थ्यांमध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या दोन विद्यार्थिनींचा समावेश होता.
कुमारी प्रतीक्षा निळकंठ मेस्त्री हिने खेळणी बनवणे या कला प्रकारात तसेच पूर्वा रामदास चांदरकर हिने नाट्य या कला प्रकारात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला.
दिनांक 2 जानेवारी 2022 ते 7 जानेवारी 2023या कालावधीत,ओडिसा भुवनेश्वर इथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
आपल्या कला व अभिनय कौशल्याने या विद्यार्थिनींनी परीक्षकांची वाहवा मिळवली. एकाच प्रशालेतून दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ही एकमेव प्रशाला होती. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर अशोक चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.
ओडीसा येथे झालेल्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांसोबत एस.सी.आर.टी. पुणे येथील वैशाली गाढवे व धनंजय क्षीरसागर सर समन्वयक म्हणून उपस्थिती होते. ओडीसा राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय श्रीमती अन्नपूर्णा देवी, ओडीसा राज्याचे राज्यमंत्री सुभाष सरकार, राजकुमार राजनाथ सिंग परराष्ट्र व शिक्षा मंत्री, भारत सरकार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ,पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, अॅड. एस. एस. पवार अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई ,सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर व सर्व सन्माननीय संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनिल फणसेकर मुख्याध्यापक संजय नाईक व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.