मालवण
शिवसेना आमदार वैभव नाईक हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत नसल्याने लाचलूचपतच्या चौकशीच्या निमित्ताने त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. मात्र आमदार नाईक हे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज आहेत. आमच्यासारखे जिल्ह्यातील तमाम निष्ठावंत शिवसैनिक त्याचे तटबंदी आहेत. त्यामुळे कितीही प्रयत्न करा, हा बुरुज ढासळणार नाही, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर अनेक आमदारांनी खोक्यांना बळी पडत मिंधे गटाची साथ दिली. काहीजण तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडले आणि मिंधे गटात गेले. मात्र आमदार वैभव नाईक हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी आणि भगव्याशी प्रामाणिक राहिले. त्यामुळे त्यांना त्रास देण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. एसीबी कडून त्यांच्या मालमत्तेची तपासणी केली जात आहे. मात्र आमदार नाईक हे राजकारणात येण्यापूर्वी पासून व्यावसायिक कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबाचे अनेक व्यवसाय आहेत. त्याबाबत सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. ते शिवसेनेचा बुरुज आहेत. आम्ही जिल्ह्यातील शिवसैनिक त्याची तटबंदी आहोत. कितीही चौकशी करा पण हा बुरुज ढासळणार नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा हा बुरुज निष्ठावंत म्हणून काम करत राहील. जोपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक तटबंदी म्हणून उभे आहेत, तोपर्यंत जिल्ह्यातील शिवसैनिक हा बुरुज ढासळू देणार नाहीत. ज्याप्रमाणे आमदार वैभव नाईक यांची चौकशी होते, तशी एसीबी कडून जिल्ह्यातील अन्य आमदारांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे धाडस सरकार दाखविणार का ? असा प्रश्न हरी खोबरेकर यांनी केला आहे.