दुर्लक्षित राहीलेली दुर्गा रामी कोळेकर…
सुशिक्षित, सुसंस्कृत घरातून अनेकजणी शिक्षण घेऊन उल्लेखनीय कामगिरी करतात. शिक्षणाच्या जोरावर आणि कौटुंबिक आधारावर मोठमोठ्या पदावर जातात, समाजासाठी मोलाचे काम करतात आणि स्वतःबरोबर आपल्या घराण्याचे सुद्धा नाव उज्वल करतात. आर्थिक आणि मानसिक सहकार्याने यश मिळविणाऱ्यांची संख्या देखील पुष्कळ आहे. परंतु पदरी अठराविश्व दारिद्र, मानसिक संतुलन बिघडलेला छोटा भाऊ आणि छोटी बहीण काहीशी मतिमंद मोठी बहीण, ना स्वतःची जागा ना मालकीचे घर अशा असंख्य अडचणींचा सामना करत कधी मासे, कधी भाजी विकत परंतु कोणाकडेही मदतीसाठी हात न पसरता आपल्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबाचा पालनपोषण करणारी रामी कोळेकर ही आजच्या युगातली खरी दुर्गा होय.
रामी कोळेकर, सावंतवाडीतील सालईवाड्यात फॉरेस्ट ऑफिस समोर पडक्या झोपडी वजा मातीच्या ढासळलेल्या घरावर पावसाच्या पाण्याला अडविण्यासाठी आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या कुटुंबाला निदान आसरा मिळावा म्हणून प्लास्टिक कापड आच्छादून राहणारी होतकरू महिला. रामी ही एकेकाळी सावंतवाडीचा स्पीडस्टार अष्टपैलू क्रिकेटपटू तानाजी कोळेकर उर्फ तान्या याची बहीण. प्रेमप्रकरणातून मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तान्या दिवसारात्री कधीही सावंतवाडीत फिरत असायचा. भगवंताने दिलेले हे दुःख कमी म्हणून तिची छोटी बहीण देखील मानसिक संतुलन बिघडल्याने तानाजीसारखीच फिरत असायची. सख्खी भावंडे मानसिक रुग्ण झाल्यावरही धीराने रामीने बांधकामावर पाणी मारणे, मासे विक्री, भाजी विक्री करत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले. मोठी बहीण काहीकाळ भाजी विकायची, परंतु ती देखील मानसिकदृष्ट्या खचल्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार रामी हिच्याच डोक्यावर पडला. काही वर्षाने मानसिक रुग्ण असूनही आधार वाटणारा भाऊ तानाजी स्वर्गवासी झाला, आणि तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
कठीण परिस्थितीत जिथे चांगली चांगली माणसे डगमगून जातात, आयुष्यात वेगळ्या मार्गावर जातात, जीवाचे बरेवाईट करण्यात धन्यता मानतात तिथे रामी कोळेकर ने आपल्या कुटुंबासाठी आपले जीवन वेचले. मानसिक रुग्ण असलेली छोटी बहीण घरात अंथरुणावर असल्याने मोठी बहिणही घरातच राहिली. त्यामुळे रामी स्वतः मासे विक्री करून मिळतील त्या पैशातून घराचा गाडा ओढत आहे. आपली आर्थिक परिस्थिती बिकट असूनही आपल्या मानसिक संतुलन बिघडलेल्या भावंडाना कोणापुढे भीक मागायला सुद्धा दिली नाही किंवा स्वतःही कोणापुढे पैशांसाठी अथवा मदतीसाठी कधी हात पसरला नाही. तर मिळतील त्या तुटपुंज्या कमाईतून आपल्या अभागी कुटुंबाला दोन वेळचे जेवण देत राहिली.
काही वर्षांपूर्वी मोडकळीस आलेले घर वजा झोपडीचे छप्पर तुटून पडले, मातीच्या भिंतीही जमीनदोस्त झाल्या. जमते तिथे स्वतःच डागडुजी करून छपरावर प्लास्टिक कापडाचे आच्छादन करून रामी आपल्या कुटुंबाला जगण्यासाठी आधार देत आहे. गेल्या दोन पिढ्या तिथेच झोपडीत राहत असूनही जमीन मालकाने जागा खाली करून मागितली व जागा खाली न केल्याने कोर्टात दावा दाखल केल्याने जगावं कसं? रहावं कुठे? आपल्या मानसिक रुग्ण असलेल्या भावंडाना घेऊन जायचे कुठे? असे प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे आहेत.
धनगर समाजातील रामी सारखी अबला नारी कोणाकडेही मदतीची याचना करत नाही, आणि समाजात जोपर्यंत कोणी आवाज देत नाही तोपर्यंत कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही ही वस्तुस्थिती आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा कष्टाळू परंतु परिस्थितीपुढे बेजार झालेल्या अबला नारीला आधार देणे गरजेचे आहे.
अंगी ना शिक्षण, ना कसली मदत ना आधार. असं असूनही अंथरुणावर असलेली मानसिक रोगी छोटी बहीण, मानसिकदृष्ट्या खचलेली मोठी बहीण यांचा कष्ट करून सांभाळ करणारी, कोणाकडेही मदतीची याचना न करणारी रामी ही आजच्या युगातली खरी दुर्गा होय…. रामीसारख्या परिस्थितीसमोर हतबल झालेल्या दुर्गेला समाजातून मानसिक, आर्थिक आधार मिळाला तर नक्कीच तिची मानसिक स्थिती चांगली राहून ती मानसिकदृष्ट्या खचलेल्या आपल्या कुटुंबाचा आधार बनू शकेल, उदरनिर्वाह करू शकेल…

